नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सोमवारी (दि.२४) महापालिकेने ‘बुलडोझर’ने कारवाई केली. कारवाई सुरू असताना फहीमच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तातडीने सुनावणी घेत तीव्र नाराजी व्यक्त करताना ही कारवाई पक्षपाती आणि लक्ष्य करण्याच्या उद्देशाने केल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदविले. तर दुसरीकडे क्रिकेट सामन्यादरम्यान भारतविरोधी घोषणा दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये केलेल्या ‘बुलडोझर’ कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावली.महापालिकेने फहीम खानच्या संजय बाग कॉलनी येथील दोन मजली इमारतीवर सोमवारी सकाळी बुलडोझर कारवाई केली. विशेष म्हणजे हे घर फहीम खान यांच्या नावावर नसून त्यांची आई जेहरुन्निसा यांच्या नावावर होते. महापालिकेने जेहरुन्निसा यांना नोटीस बजावून अनधिकृत बांधकाम २४ तासांत पाडून टाकण्याची सूचना केली होती. त्यानंतर सोमवारी सकाळीच महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक जेहरुन्निसा यांच्या घरी पोहोचले व काही तासांत त्यांनी दोन मजली इमारत भुईसपाट केली. याविरुद्ध जेहरुन्निसा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. महापालिकेने शुक्रवारी (दि.२१) दुपारी अतिक्रमणाबाबत नोटीस दिली. शनिवारी (दि.२२) आणि रविवारी (दि.२३) सुट्टी होती. सुनावणीची संधी न देता सोमवारी सकाळीच घर तोडण्याचे काम सुरूही करून टाकल्याचे यात म्हटले आहे. न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृशाली जोशी यांच्या खंडपीठाने याचिका तातडीने दाखल करून घेत महापालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
(संग्रहित दृश्य.)
कारवाई करण्याबाबतची नोटीस व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवली…
महापालिकेने सकाळी १० वाजता कारवाई सुरू केली. मात्र कारवाई करण्याबाबतची नोटीस दुपारी १ वाजता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवली असा आरोप याचिकेत करण्यात आला असून महापालिकेने मात्र केवळ अवैध बांधकाम तोडल्याचा दावा न्यायालयात केला. हिंसाचारातील दुसरा आरोपी अब्दुल हफीज शेख याच्या घरावरील कारवाईलाही स्थगिती देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार, बांधकाम तोडल्यामुळे नुकसान भरपाईचा मुद्दा याचिकेत समाविष्ट करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या.नागपूर महापालिकेने नियमांचे पालन केले नसल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांनाही स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. अॅड. अश्विन इंगोले यांनी खान यांची बाजू मांडली. याचिकेवर पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी होणार आहे.
नियमावली काय ?
– एखादी व्यक्ती आरोपी आहे म्हणून तिच्या मालमत्ता बुलडोझरने पाडणे हे घटनाविरोधी असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
– मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अशा कारवाईबाबत नियमावली तयार करून दिली होती.
– यात बांधकाम तोडण्यापूर्वी पुरेसा कालावधी देण्यात यावा, जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देण्यात यावी, सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर घर पाडण्याचा निर्णय घेतल्यावर १५ दिवसांचा कालावधी देण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.