विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्व पक्षांकडून राज्यभर प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. या प्रचारादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसला सुरूच आहे. अशामध्ये महायुतीमधील घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर त्यांच्या शारिरीक व्यंगावरून टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांची जीभ घसरल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून टीका केली जात आहे. अशामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावरून संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट सदाभाऊ खोत यांना इशारा दिला आहे.
(संग्रहित दृश्य.)
पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर टीका केल्यास…
अजित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य निंदनीय असल्याचे म्हटले आणि त्यांना थेट इशारा दिला आहे. अजित पवार यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही. असा इशारा अजित पवारांनी सदाभाऊ खोतांना दिला.