प्रेमविवाहाला विरोध होत असल्याने अनेकजण कुटुंबानी ठरवून दिलेल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करतात किंवा घरच्यांना धुडकावून प्रेमविवाह करतात. पण कोणी प्रेयसी आणि कुटुंबाची मर्जी राखण्याकरता दोन लग्न केल्याचं आठवतंय का ? धक्कादायक म्हणजे कोणी दोन्ही लग्न एकाच दिवशी केल्याचं आपण पाहिलंय का ? असाच एक धक्कादायक प्रयत्न उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली असून तरुणावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोरखपूरच्या हरपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे चार वर्षांपासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. पण तरुणाच्या या नात्याला त्याच्या घरातून विरोध होत होता. त्यामुळे तरुणाने आपण ठरवून दिलेल्या मुलीशीच लग्न करावं असा आग्रह तरूंणाच्या कुटुंबियांकडून केला जात होता. दरम्यान तरुणाच्या प्रेयसीने आतापर्यंत दोन वेळा गर्भपात केला. पण जेव्हा ती पुन्हा गर्भवती राहिली तेव्हा तिला प्रसूतीसाठी एका वृद्धाश्रमात पाठवण्यात आले. तिथे तिची प्रसुती झाल्यानंतर त्या बाळाला एका परिचारिकेकडे ठेवण्यात आले. याच काळात या दोघांनी मंदिरात लग्नही केलं होतं. पण त्यांनी कोर्ट मॅरेज केलं तर त्यांचं नातं घरचे स्वीकारतील असं प्रेयसीला सांगितलं. त्यामुळे त्यांनी सकाळी कोर्टात जाऊन लग्न उरकले. धक्कादायक म्हणजे त्याच दिवशी सायंकाळी तरूणाच लग्न त्याच्या घरच्यांनी ठरवलेल्या मुलीबरोबर पारंपरिक विधीने झाले. ही बाब त्याच्या प्रेयसीला कळताच ती तरुणाच्या घरी गेली. पण तिथे तिचा अपमान झाल्याचा दावा तिने केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी जितेंद्र कुमार श्री वास्तव म्हणाले की या संदर्भात तक्रार मिळाली आहे. आणि प्रेयसीने केलेले आरोप खरे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.