संगमनेर मतदार संघात आता विखे विरुद्ध थोरात असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी आपण संगमनेर मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे वारंवार संकेत दिले आहे. सुजय विखेंना प्रतिउत्तर देत आम्हाला सुजय विखेंचे काहीही आव्हान वाटत नाही. त्यांना संगमनेर इथे यायचे असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू त्यांनी संगमनेर विधानसभेची निवडणूक नक्की लढवावी. मात्र हा मतदारसंघ बाळासाहेब थोरातांचा परिवार असल्याने सुजय विखेंना इथून निराश होऊनच परत जावे लागेल. असा स्पष्ट व थेट इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी दिला आहे.
(संग्रहित दृश्य.)
आमच्या तालुक्यात चांगल्या उद्देशाने आले तर आम्ही स्वागत करू.
विखे व आमचा संघर्ष कधी थांबणार हे काळच ठरवेल. कुणी आमच्या तालुक्यात चांगल्या उद्देशाने आले तर आम्ही स्वागत करू मात्र इथे येऊन तालुक्यातील जनतेला त्रास देणार असाल तर संघर्ष सुरूच राहील. असा अप्रत्यक्ष इशाराही जयश्री थोरात यांनी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव माजी खासदार डॉ. सुजय विखे यांना दिला आहे. विखे व थोरात यांच्या राजकीय वादावर प्रथमच जयश्री थोरात यांनी राजकीय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय हाडवैर जिल्ह्याला सर्वश्रृत आहे. विखे व थोरात एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. संगमनेर विधानसभा मतदारसंघात थोरात यांच्या विरुद्ध निवडणूक लढविण्याची घोषणा डॉ. सुजय विखे यांनी केल्याने खरेच विखे व थोरात यांच्यात लढत होणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.