“एक तर माहेरातून मशीनसाठी पैसे आणून दे किंवा आत्महत्या कर”,डॉक्टर पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्त्या…
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | SOLAPUR | PANDHARPUR | INDIAN MEDICAL ASSOCIATION PANDHARPUR | DOCTOR'S WIFE COMMITTED SUICIDE AFTER SUFFERING FROM HER HUSBAND | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मालकीहक्क असलेल्या जमिनीवर कर्ज काढून एमआरआय मशिन खरेदी करण्यासाठी डॉक्टर पतीने केलेला छळ असह्य झाल्याने डॉक्टर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉक्टर पतीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ…
सांगोला येथे घडलेल्या या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हा चर्चेचा विषय झाला आहे. सांगोल्यातील ज्येष्ठ उद्योजक भाऊसाहेब रूपनर यांच्या सून असलेल्या डॉ. ऋचा सूरज रूपनर (वय ३५) यांनी सांगोल्यात फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसाहतीत स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या आपले पती डॉ. सूरज रूपनर यांच्या सोबत पंढरपुरात फॅबटेक हॉस्पिटल चालवत होत्या. डॉ. ऋचा यांचे बंधू ऋषिकेश संजय पाटील (रा. पंढरपूर) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत डॉ. ऋचा आणि डॉ. सूरज यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. मात्र डॉ. सूरज हा व्यभिचारी होता. आपल्या रूग्णालयात त्यास एमआरआय मशिन खरेदी करायची होती. त्यासाठी तो पत्नी डॉ. ऋचा हिच्या मालकीहक्काची असलेली पंढरपुरातील जमीन गहाणखत करून बँककर्ज काढावे किंवा माहेरातून तेवढी रक्कम आणावी म्हणून मागे लागत असे. तेव्हा डॉ. ऋचा हिने माहेरातून पुरेशी रक्कम आणून दिली होती. मात्र त्या रकमेतून एमआरआय मशिन खरेदी न करता आणखी पैसे आणून द्यावे म्हणून त्याने छळ सुरूच केला होता. जमीन गहाणखत करून बँककर्ज काढून देण्यासाठी सतत तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ चालविल्यामुळे वैतागलेल्या डॉ. ऋचा हिने त्यास जाब विचारला असता, त्याने पुन्हा जास्त छळ केला. एक तर माहेरातून पैसे आणून दे किंवा आत्महत्या कर, अशी भाषा वापरल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या डॉ. ऋचा हिने घरात सकाळी आत्महत्येचा टोकाचा मार्ग पत्करल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
वैद्यकीय क्षेत्रातून बहिष्कृत करण्याचा इशारा…
डॉ. ऋचा रूपनर आत्महत्या प्रकरणी तिचा पती डॉ. सूरज रूपनर यास तात्काळ अटक करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पंढरपूर शाखेने केली आहे. तसेच या गंभीर घटनेमुळे डॉ. सूरज रूपनर यास पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातून बहिष्कृत करण्याचा इशाराही असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील कारंडे यांनी दिला आहे. तसा ठराव असोसिएशनच्या बैठकीत संमत झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.