मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील २ कोटी २८ लाख पात्र महिलांना सन्मान निधी मिळाला आहे. आतापार्यंत ५ हप्त्यांचे पैसे मिळाले असून आचारसंहितेच्या काळात नवीन अर्ज स्वीकारणे थांबवण्यात आले आहे. दरम्यान निवडणूक प्रचारात विरोधकांनी या योजनेवर टीका केली. तसंच निवडणुकीपुरती ही योजना असल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पात्र महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
(संग्रहित दृश्य.)
आमचे विरोधक माझ्या माय माऊलींच्या मनात भ्रम पसरवत आहे.
अजित पवार म्हणाले. गेल्या काही आठवड्यात तुम्ही मला जे प्रेम आणि माया दिली. त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे. दरवर्षी राखीपौर्णिमेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते. तुम्ही मला हजारो राख्या बांधून जगातील भाग्यशाली दादा बनवलं आहे. हे मी कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाने आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने माझ्यावरील जबाबदारी लाखपटीने वाढली आहे. तुमचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तुम्हाला लाभ आणि बळ देण्यासाठी तुमचा दादा तसूभरही कमी पडणार नाही. हा माझा वादा आहे. आणि तो मी शेवटपर्यंत निभावणार. तीन महिन्यांपूर्वी महायुती सरकारच्या वतीने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या. योजनांचा घोषणा करून मी थांबलो नाही तर योजनांची अंमलबाजवणी केली. सर्वांत महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. माय माऊलींना स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता मी अर्थमंत्री म्हणून उचलेलं पाऊल सगळ्यात मोठं पाऊल होतं. असंही अजित पवार म्हणाले. दुर्दैवाने आमचे विरोधक लाडकी बहीण योजनेसंबंधित माझ्या माय माऊलींच्या मनात भ्रम पसरवत आहेत. लाडकी बहीण योजना मी जाहीर केली तेव्हा विरोधक म्हणत होते की या योजनेची अंमलबाजवणी शक्य नाही. जेव्हा आम्ही या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आणि माझ्या माय माऊलींनी आनंदाने योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात केली तेव्हा विरोधक म्हणू लागले की फॉर्म भरून घेतील पण खात्यात पैसेच येणार नाहीत. जेव्हा बहिणींच्या खात्यात ५ महिन्यांचे साडेसात हजार रुपये जमा झाले, तेव्हा भेदरलेले आणि घाबरलेले विरोधक म्हणू लागले की आता पैसे आले तरी निवडणुकीनंतर येणार नाहीत. आमचे विरोधक नेहमीच खोटा आणि बिनबुडाचा प्रचार करतात आणि तुमचा दादा तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या खात्यात पैसे जमा करत राहिला. आणि या पुढेही तुमच्या खात्यात दर महिन्याला न चुकता पैसे येत राहतील. असं अजित पवारांनी आश्वासित केलं.
(संग्रहित दृश्य.)
तुमचा हा दादा ही योजना बंद होऊ देणार नाही.
राखीपौर्णिमेला बहिणींना ओवाळणी दिली तशीच भाऊबीजेलाही दिली. येत्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न करेल. महिलांसाठी उचलेलं हे ऐतिहासिक पाऊल असेल. याला जोडूनच माझ्या बहिणींना सांगू इच्छितो की विरोधकांनी सांगितलंय की निवडणूक संपल्यानंतर ही योजना बंद करतील. परंतु तुम्ही बांधलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेऊन सांगतो की , तुमचा हा दादा ही योजना बंद होऊ देणार नाही. असा विश्वासही अजित पवारांनी पात्र महिलांना दिला. निवडणुकीच्या वेळी विविध पक्ष एकमेकांवर आरोप करतात,हल्ले करतात. परंतु विरोधक लाडकी बहीण योजनेबद्दल माय माऊलींचा अपमान करत आहेत. भीतीचं वातावरण पसरवत आहेत. पूर्वी विरोधकांनी सांगितलं की पैसे मिळणारच नाहीत. आता म्हणत आहेत पैसे का देत आहे ? विरोधक म्हणत आहेत महिलांना थेट पैसे देणं व्यर्थ आहे. पण मी विरोधकांना सांगू इच्छितो की मागच्या दोन महिन्यांत मला काही भगिनी भेटल्या. काहींनी राखी सोबत पत्रही पाठवलं. त्या प्रत्येक पत्रात माझी भगिनी त्यांना मिळत असलेल्या रक्कमेतून त्या काय करणार हे सांगत होत्या. असं अजित पवारांनी सांगितलं. विरोधकांना माझी हात जोडून विनंती आहे मला जी शिवीगाळ करायची आहे ती निश्चित करा. पण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून करोडो कुटुंबातील स्वप्न जोडले गेले आहेत. त्यामुळे खोटी माहिती पसरवून स्वप्नांची राखरांगोळी करू नका. माय माऊली या योजना बंद करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धडा शिकवतील. असंही ते म्हणाले.