TIMES OF AHMEDNAGAR
मुंबईत कांदिवलीत एका नर्सरी स्कूल मधील चार वर्षाच्या मुलीवर शाळेतील कर्मचाऱ्याकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील कर्मचाऱ्याने पीडित मुलीला चॉकलेट देण्याचा बहाणा करून जवळ बोलवलं आणि बाथरूममध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत मुलीवर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

मात्र अत्याचाराचे प्रकरण माहिती असताना सुद्धा शाळेतील शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांनी हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. आज पीडित मुलीचे पालक आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या शेकडो पालकांनी रस्त्यावर चक्काजाम करत शाळेविरोधात तीव्र आंदोलन केले.

तब्बल सहा तासापेक्षा अधिक काळ हे आंदोलन सुरू राहिले. अखेरीस शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी मध्यस्थी करून पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांची भेट घेऊन शाळेतील शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. यावेळी मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांशी संवाद साधून शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्याचे विनंती केली. यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले.


