भारताचा अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना रविवारी होणार. यावेळी भारताचा प्रयत्न मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचा आहे.
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | AFGHANISTAN | CRICKET TOURNAMENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.|
भारत विरुद्ध अफगाणिस्तानचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना रविवारी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न भारताचा असणार आहे.या सामन्यात अनेक खेळाडू चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील. भारताने मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात सहा गडी राखून विजय मिळवला होता. या विजयामुळे संघाने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन हे जून महिन्यात होणार आहे आणि त्याआधीची ही अखेरची आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका आहे. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना उर्वरित दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. त्यामुळे अनेक खेळाडूंच्या कामगिरीकडेही यावेळी लक्ष राहील. विराट कोहली देखील या सामन्यात पुनरागमन करणार आहे.
जितेश शर्माला इशान किशनच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. त्याने संघासाठी काही उपयुक्त खेळीही केल्या आहेत व आपले स्थान निश्चित करण्यासाठी त्याचा प्रयत्न मोठी खेळी करण्याचा राहील. तिलक वर्माने गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांत ३९, ५१ व नाबाद ४९ धावांची खेळी केली होती. विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाल्यानंतर तिलकला अंतिम अकरामध्ये स्थान मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे असेल. दुखापतीमुळे एकदिवसीय विश्वचषकात सहभागी न झालेल्या अक्षरला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत संघात स्थान देण्यात आले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने दोन गडी बाद केले होते.
अफगाणिस्तानचे खेळाडू
अफगाणिस्तान संघातही रहमानुल्ला गुरबाझ, अजमतुल्ला ओमरझाई आणि अनुभवी मोहम्मद नबी आक्रमक खेळी करणारे खेळाडू आहेत. गोलंदाजीत रशीद खानच्या अनुपस्थितीतही अफगाणिस्तान संघाकडे मुजीब-उर-रहमान सारखा फिरकी गोलंदाज आहे. त्याला वेगवान गोलंदाज नवीन उल हक व फजलहक फारूकीचीही साथ मिळत आहे. हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न राहील.