मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो माध्यमांवर व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) धनंजय मुंडे यांनी (दि.४) मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी या दोघांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला होता.आता मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचे पाहायला मिळते. कारण काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने कृषी खात्यात २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. आता सुरेश धस कृषी विभागातील घोटाळ्याची थेट ईडीकडे तक्रार करणार आहेत. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची २०० कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा सुरेश धस यांनी दावा केला होता. त्यांनी म्हटलं होतं की नॅनो युरियामध्ये २१ कोटी २६ लाखांचा भ्रष्टाचार झालेला आहे. डीएपीत ५६ कोटी ७६ लाख रुपये बॅटरी ४५ कोटी ५३ लाख, कापूस साठवणूक बॅगमध्ये ५७७ ची बॅग १२५० रुपये घेण्यात आली, तर १८० कोटी ८३ लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमूने बाहेर काढले. लोकायुक्त कार्यालयाला खोटी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या काळातील या भ्रष्टाचाराची विशेष कृती दल (एसआयटी) स्थापन करून चौकशी करा. शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदीचा निर्णय घेण्यात आला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी जीआर निघाला. हे सर्व डीबीटीने द्यावे असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सुचवले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया,नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा, असे आदेश काढल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला होता.
(संग्रहित दृश्य.)
धासांची कृषी घोटाळ्याबाबत तक्रार…
यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला आहे. कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहे. सुरेश धस कृषी विभागातील घोटाळ्याबाबत ईडीला पत्र लिहून तक्रार करणार आहेत. कृषी विभागातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्यावरील संकटं कमी होताना दिसत नाही.