गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातंर्गत शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी लावून धरली आहे. तसेच कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. आता याबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या खासदारांनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर खासदारांनी राज्यपालांना पत्र लिहून आपण दखल घ्यावी, राज्य सरकार मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत उदासीन असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राज्य सरकार याबाबत सक्रीय झालेय. बजरंग सोनवणे, राजेंद्र राऊत, ओमराजे निंबाळकर, राजेश टोपे, कल्याण काळे, यांच्यासह अनेक खासदार-आमदारांनी त्यांची भेट घेतली आहे.