मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत आठ मोठे निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावादेखील घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता २.५ (अडीच वर्ष) ऐवजी ५ (पाच वर्ष) करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांता नगराध्यक्षपदासाठी सोडत निघणार होती, त्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहत होते, त्यांच्या अपेक्षांवर आता पाणी फेरलं गेलं आहे.
(संग्रहित दृश्य.)
नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्या नगरसेवकांची घोर निराशा ?
महाराष्ट्रात २२८ नगरपरिषदा व नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पाच वर्षांच्या कालावधीपैकी अडीच-अडीच वर्षांचे असे दोन अध्यक्ष निवडण्याचे निश्चित करून पहिल्या टप्प्याच्या नगराध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील नगराध्यक्षांची निवड काही दिवसांवर येऊन ठेपली असता नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षावरुन आता पाच वर्षांवर करण्यात आला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्या नगरसेवकांची घोर निराशा झाली आहे.