मुंबई : विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात मनसेच्या अमित ठाकरे यांच्या पराभवाला हातभार लावणारे शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांच्या मुलाने राज ठाकरे यांना डिवचले आहे. समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर एक भलामोठ्ठा फलक लावला आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात कुंभमेळ्यातील गंगा नदीच्या प्रदुषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. हे पाणी शुद्ध मानून पिणाऱ्यांची राज ठाकरे यांनी एकप्रकारे खिल्ली उडवली होती. याच मुद्द्यावरुन सदा सरवणकरांच्या पुत्राने राज ठाकरे यांना डिवचले आहे. गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय ? असा मजकूर समाधान सरवणकर यांनी लावलेल्या फलकावर लिहला आहे. या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिकांची कुंभमेळ्यातील छायाचित्रे लावण्यात आली आहेत. १४४ वर्षांनी आलेल्या दिव्य महाकुंभ सोहळ्यात जगभरातील ६० कोटींहून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते. त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान करुन अखंड हिंदू एकात्मतेचा संदेश दिला. कुंभमेळा हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे. हा क्षण अभिमानाचा आणि गौरवाचा होता. हा क्षण हिंदुंच्या एकजुटीचा होता असा मजकूर या फलकावर लिहला होता. तसेच गंगाजल शुद्धच आहे पण काही लोकांच्या विचारांचं काय असा सवाल विचारत समाधान सरवणकर यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. या माध्यमातून शिंदे गटाने एकीकडे राज ठाकरे यांना लक्ष्य करताना दुसरीकडे कडवट हिंदुत्त्वाचा पुरस्कारही केला आहे. शिंदे गटाचा हा बॅनर शिवसेना भवनासमोर म्हणजे राज ठाकरे यांच्या घरापासून काही अंतरावरच लावण्यात आला आहे. त्यामुळे आता यावर मनसेचे नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागेल. दादरचा परिसर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष असलेल्या संदीप देशपांडे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आता संदीप देशपांडे हे समाधान सरवणकर आणि शिंदे गटाला जशास तसे प्रत्युत्तर देणार आहेत का ?