मुंबई: बंगळुरुतील एका सॉर फ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामाला असणाऱ्या राकेश खेडेकर याने त्याची पत्नी गौरी सांबरेकर हिची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राकेश खेडेकर आणि गौरी सांबरेकर हे दोघेही मुंबईत राहणारे होते. दोन वर्षांपूर्वी राकेश आणि गौरीचे लग्न झाले होते. गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी आहे. या दोघांच्याही घरचे नात्यात लग्न करायला तयार नव्हते. मात्र राकेश आणि गौरी यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. जवळपास चार वर्षे राकेशचे कुटुंबीय त्याला समजावत होते. मात्र राकेश आणि गौरी यांनी आम्ही लग्न करु तर एकमेकांशीच अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे दोघांच्याही घरच्यांनी नाईलाजाने या लग्नाला मंजुरी दिली. मात्र या प्रेमकहाणीचा इतका भयंकर शेवट होईल याची कल्पनाही कोणीही केली नव्हती. प्राथमिक माहितीनुसार राकेश आणि गौरी महिनाभरापूर्वीच बंगळुरुला राहायला गेले होते. गौरीने मास मिडीयाचे शिक्षण घेतले होते. तीदेखील बंगळुरुत नोकरी शोधत होती. मंगळवारी (दि.२३) रात्री राकेश आणि गौरी यांच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्यावेळी राकेशने संतापाच्या भरात किचनमधील चाकूने तीनवेळा गौरीच्या शरीरात खुपसला होता. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर रक्तस्राव होऊन गौरीचा मृत्यू झाला. राकेशने गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला. त्यानंतर राकेश पळून पुण्याला आला होता. राकेश खेडेकर याने गौरीचा खून केल्यानंतर मुंबईतील जोगेश्वरी परिसरात राहणाऱ्या आपल्या वडिलांना फोन केला. मंगळवारी रात्री १२ वाजता त्याने वडिलांना फोन केला होता. त्यानंतर सकाळी त्याने मला पुन्हा फोन केल्याचे वडिलांना सांगितले. तो वडिलांना म्हणाला की मी असं केलं आहे ती माझ्याशी खूप भांडत होती त्रास देत होती असे राकेशने सांगितले.
(संग्रहित दृश्य.)
राकेशच्या वडिलांनी सांगितले की गौरीबद्दल …
राकेशच्या वडिलांनी सांगितले की गौरी ही माझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी होती. ती माझी भाची होती. गौरी सतत भांडायची. तिच्या आईनेही तिला समजावले होते. गौरीची आई ८६ वर्षांची आहे. जोगेश्वरीला राहत असताना तिलादेखील गौरीने खूप त्रास दिला होता. तेव्हादेखील हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. गौरी सुरुवातीपासूनच मानसिक रुग्णासारखी वागायची. तिने एकदा तिच्या भावालाही मारले होते. आम्हाला ही गोष्ट माहिती होती. त्यामुळे आम्ही आमच्या मुलाचे तिच्याशी लग्न लावून द्यायला तयार नव्हतो. आम्ही चार वर्षे थांबलो होतो. मात्र त्यावेळी राकेश आणि गौरी कोणाचेही ऐकायला तयार नव्हते. आम्ही एकमेकांशी लग्न करु नाहीतर करणार नाह. असे त्यांचे म्हणणे होते. ते ऐकत नसल्याने मग आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं असे राकेशच्या वडिलांनी सांगितले. राकेशने मला फोन करुन सांगितले की मी गौरीला मारले आहे. तुम्ही ही गोष्ट सगळ्यांना सांगा तिच्या आईलाही सांगा. आता मी देखील स्वत:ला संपवणार असल्याचे तो म्हणाला. मी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी थेट जोगेश्वरी पूर्वचे पोलीस ठाणे गाठून त्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी राकेशला फोन केला. राकेशने स्वत:च पोलिसांना बंगळुरुतील फ्लॅटचा पत्ता पोलिसांना दिला.