पवार घराण्यातील द्वंद्वामुळे लोकसभेप्रमाणे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील वातावरण सुरुवातीलाच प्रचंड तापले आहे. कारण आता स्वत: शरद पवार यांनी त्यांची नेहमीची चाकोरी सोडून अजित पवार यांची नक्कल केली आहे. अजित पवार यांची काल बारामतीमध्ये सभा झाली होती. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीमधील सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली आहे. शरद पवारांच्या या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शरद पवार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(संग्रहित दृश्य.)
अजित पवारांची नक्कल केल्यानंतर शरद पवार यांनी आपली……
अजित पवार यांची नक्कल केल्यानंतर शरद पवार यांनी या सगळ्यावर आपली भूमिका मांडली आहे. हा प्रश्न भावनेचा नाही, हा मुद्दा तत्त्वाचा आणि विचारांचा आहे. आम्ही गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेतले आहे. मी याच विचारांनी काम करतो. गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण, ज्योतीराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या सर्वांची विचारधारा ही माझी विचारधारा आहे. या विचारधारेसाठी मी काम करणार. हीच माझी पद्धत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. मी गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक तालुके पालथे घातले आहेत. कारण मला महाराष्ट्रातील सत्ता बदलायची आहे. राज्याची सत्ता सामान्यांच्या हाती द्यायची आहे. ते करायचं असेल तर तुम्ही आम्ही एकजुटीने आपली शक्ती उभी केली पाहिजे, असे सांगत शरद पवार यांनी बारामतीच्या जनतेला साद घातली.
(संग्रहित दृश्य.)
पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असंत का?
बारामतीमधील पहिल्याच सभेत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की , घरात दो भाऊ असतील तर एकाने शेती आणि दुसऱ्याने नोकरी करायची असते. आम्ही सत्ता लोकांसाठी वापरली, आम्ही रोजगार दिले आहे. पक्षात मी मार्गदर्शन जबाबदारी घेतली आणि नवी पिढ्याच्या हातात अधिकार दिला. पण सत्ता नाही म्हणून सहकाऱ्यांनी आमचा साथ सोडली. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असंत का? घर मोडणे माझा स्वभाव नाही.कुटूंब एक राहिले पाहिजे. ही माझी भूमिका असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.