कंपनीमध्ये काम करायचे असल्यास हप्ता म्हणून पैसे द्यावे लागतील. असे म्हणून तीन कामगारांना मारहाण केल्याची घटना शनिवारी २६ ऑक्टोबर दुपारी ४.३० देऊळगाव सिध्दी ,ता. नगर, शिवारात घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुफीज महमद आत्तार (वय २४) रा. मंगरोरा, ता. मुसाफिरखाना, जि. अमेठी, उत्तर प्रदेश, हल्ली रा. देऊळगाव सिध्दी यांनी फिर्याद दिली आहे.
(संग्रहित दृश्य.)
पैसे दिले नाही तर तुम्हाला तलवारीने कापुन टाकू.
महादेव सुर्यभान आळकुटे, दीपक मुरलीधर घायमुक्ते व दोन अनोळखी सर्व रा. देऊळगाव सिध्दी. अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र वडगाव तांदळी (ता. नगर) शिवारातील करिमिया फुड्स लिमिटेड या कंपनीत काम करतात. फिर्यादीचा मित्र महमद इबरीस इसराल याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने फिर्यादी व त्यांचा दुसरा मित्र असलम फरीद अहमद हे त्याला घेऊन शनिवारी दुपारी देऊळगाव सिध्दी येथील बस स्थानका जवळील रूग्णालयात गेले होते. ते रूग्णालया समोर उभे असताना संशयित आरोपी तेथे आले व ते म्हणाले, तुम्ही या कंपनीमध्ये काम करायचे नाही. त्यावर फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना त्याचा त्यांना राग आला. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या दोन्ही मित्रांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुम्हाला जर या कंपनीमध्ये काम करायचे असेल तर आम्हाला हप्ता म्हणून पैसे द्यावे लागतील, तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुम्हाला एक एकाला तलवारीने कापुन टाकू अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्यात झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या खिशातील पैसे व मोबाईल गहाळ झाला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सातभाई करत आहे.