पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उदय हरिदास वैराळ, वय २२, रा. ओटा परिसर, बिबवेवाडी, असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धार्थ अशोक शिगवण (रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी), सोनू शिंदे (रा. महर्षीनगर) यांच्यासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैराळ याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. उदय वैराळ याचा आरोपींशी वाद झाला होता. रविवारी रात्री अकराच्या सुमारास वैराळ पुणे-सातारा रस्त्यावरील शिल्पा हाॅटेलजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपी सिद्धार्थ शिगवण, सोनू शिंदे साथीदारांसह तेथे आले. आरोपींनी दहशत माजवून त्याला शिवीगाळ केली होती. आरोपी शिगवण, शिंदे यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी वैरळाला मारहाण केली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, अधिक तपास पोलीस करत आहे.