नागपूर : दोन मुलांची आई असलेल्या महिलेची वस्तीतच राहणाऱ्या युवकाशी मैत्री झाली. काही दिवसांतच दोघांचे प्रेम प्रकरण सुरु झाले. पती कामावर गेल्यानंतर दोघांच्या घरीच भेटी-गाठी व्हायला लागल्या. परंतु दोघांच्या प्रेमात पती अडसर ठरु लागला. रात्रीच्या सुमारास पती झोपल्यानंतर प्रियकर घराच्या छतावर भेटायला येत होता. मात्र रात्री दीड वाजता पतीला जाग आली आणि त्याला पत्नी घरात दिसली नाही. त्यामुळे पती छतावर गेला. तेथे पत्नी परपुरुषाच्या मिठीत दिसली. संतापलेल्या पतीने पत्नी व तिच्या प्रियकराची चांगली धुलाई केली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. प्रियकर बळजबरी करीत असल्याची तक्रार महिलेने दिल्यानंतर पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहित महिला आरती (२९ वर्षे,) ही गृहिणी असून पती व दोन मुलींसह पारडी परिसरात राहते. तिचा पती एका कंपनीत नोकरीला आहे. पती सकाळी आठ वाजता नोकरीला गेल्यानंतर थेट रात्री १० वाजता घरी येतो. तिच्याच वस्तीत अंकुश (वय ३५) हा बेरोजगार युवक राहतो. तो गु्न्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर कळमना आणि वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वस्तीतील एका लग्नात दोघांची ओळख झाली. तेव्हा दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. दोघांची अल्पवधीत मैत्री झाली. तो आरतीच्या भेटीसाठी घरी यायला लागला. आरतीने मित्र म्हणून पतीशी ओळख करुन दिली. त्यामुळे तो वारंवार घरी यायला लागला. यादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पती कामावर जाताच आरती त्याला घरी बोलावून घेत होती. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरु होता. पत्नीचा मित्र असल्यामुळे पती दोघांच्या नात्यावर कधीही संशय घेत नव्हता. दोघांचे प्रेम एवढे घट्ट झाले की दोघेही एकमेकांशिवाय राहत नव्हते.
(संग्रहित दृश्य.)
असे आले प्रेम प्रकरण उघडकीस…
अंकुश आणि आरती हे दोघेही मध्यरात्रीनंतर घराच्या छतावर भेटत होते. शनिवारी ( दि.२२) रात्री १.३० वाजता पती झोपी गेल्यानंतर आरतीने प्रियकराला फोन केला. तो शेजारच्या भींतीवरुन घरात शिरला. छतावर जाऊन वाट बघत होता. दरम्यान आरती पोहचली. दोघेही एकमेकांना मिठीत घेऊन गप्पा करीत होते. दोघांच्या गप्पा रंगल्या असतानाच पतीला अचानक जाग आली. पत्नी घरात दिसत नसल्यामुळे तो तिच्या शोधात छतावर आला. छतावर दोघेही नको त्या अवस्थेत दिसले. त्यामुळे तिच्या पतीचा पारा चढला. त्याने दोघांनाही चोप दिला. हा बळजबरी करीत होता माझी काहीच चूक नाही असा पवित्रा आरतीने घेतला. त्यामुळे प्रकरण पारडी पोलीस ठाण्यात गेेले. आरतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अंकुश वर गुन्हा दाखल करुन अटक केली.