महाराष्ट्र विधानसभेच्या परळी मतदारसंघात बोगस मतदानावरून मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मतदार केंद्रावर जात मारहाण केल्यानंतर त्याचे पडसाद इतर मतदार केंद्रावरही होत आहेत. बीडमधील परळी मतदारसंघात तीन मतदानकेंद्रावर तासभर मतदान थांबवण्यात आले होते. घाटनांदुरमध्ये मतदान केंद्रात झालेल्या तोडफोडीनंतर त्या तीन मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मतदानकेंद्रावरील मतदान यंत्रांची तोडफोड झाल्यामुळे प्रशासनाकडून पोलिसाला पाचारण करण्यात आले आहे. परळीत या राड्यामुळे काही काळ तणाव निर्माण झालं होतं. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सुत्रांनी सांगितलं. घाटनांदूर मतदान केंद्रात तासाभरानंतर वातावरण निवळल्यानं पुन्हा सुरळीत मतदान सुरु झाले आहे. बोगस मतदानावरून झालेल्या वादात शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद परळीत त्यांच्या घाटनांदूरच्या मतदान केंद्रांवर तणाव दिसला. घाटनांदूरच्या तीन मतदान केंद्रांवर इव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली. मतदानकेंद्रातील खूर्च्यांची फेकाफेकी झाल्याचंही दिसून आलं आहे. परळी मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना ऍडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली आहे. असा एक व्हिडिओ सध्या पुढे आल्याचे बघायला मिळत आहे. मतदान केंद्राबाहेर उभे असताना, जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत.