पुणे : भोर तालुक्यातील सारोळे गावात नदीपात्रात सापडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना आता यश आले आहे. ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्यातील पथकाकडून करण्यात आलेल्या तपासात अनैतिक संबधातून महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे उघडकीस झाले आहे. या प्रकरणी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. सिद्धेश्वर बंडू भिसे (वय ४०, रा. ससाणेनगर, हडपसर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी योगिता सिद्धेश्वर भिसे (वय ३०, सध्या रा. हडपसर, मूळ वडगाववाडी, ता. लोहारा, जि. धाराशिव) आणि शिवाजी बसवंत सुतार (वय ३२, रा. अंदूर, जि. धाराशिव) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून पत्नी योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी यांनी सिद्धेश्वर बंडू भिसे यांचा गळा आवळून खून केलेला आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह भोर तालुक्यातील सारोळा गावातील नीरा नदीपात्रात टाकून दिल्याचे तपासात उघडकीस झाले आहे. अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपी शिवाजी सुतार आणि योगिता भिसे यांच्यात अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधाची कुणकुण पती सिद्धेश्वर भिसे यांना लागली होती. त्यांनी अनैतिक संबंधास विरोध केला असता दोघांनी शनिवारी (दि.८ मार्च) सिद्धेश्वर यांचा हडपसरमधील ससाणेनगर परिसरातील घरात गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या मोठ्या पिशवीत भरला. पुरावा नष्ट करण्यासाठी पिशवीत असलेला मृतदेह सारोळ्याजवळील नदीपात्रात टाकून दिला होता. अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात सापडल्यानंतर राजगड पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. या तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिवाजी आणि योगिता यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.