मुंबई : मुंबईतील व्यावसायिक जिग्नेश दोशी (४५) व त्यांची पत्नी काश्मिरा जिग्नेश दोशी यांच्या मृत्यूप्रकरणी चार वर्षांनंतर कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नी काश्मिरा जिग्नेश दोशी यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे न्यायवैधक अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा अहवाल गुरुवारी प्राप्त झाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. करोनाच्या आर्थिक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून घरभाडे देऊ न शकल्याने पती जिग्नेश दोशीने पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
(संग्रहित दृश्य.)
घर भाडे देऊ शकले नसल्याने या जोडप्याने आत्महत्या केली.
हा प्रकार २५ ऑगस्ट, २०२० रोजी घडला होता. जिग्नेश व काश्मिरा दोशी यांचा १७ वर्षांच्या मुलगा घरी आला. त्यावेळी त्याची आई मृतअवस्थेत खाटेवर पडली होती. त्यानंतर त्याने वडिलांना जोरात हाक मारली. मात्र वडिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याचदरम्यान त्याला शौचालयाचा दरवाजा उघडा दिसला. त्याने दरवाजा ढकलला असता वडिलांनी शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या निदर्शनास आले होते. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, मृतदेहाच्या शेजारी चिठ्ठीसापडली होती. त्यात करोनाच्या आर्थिक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून घर भाडे देऊ शकले नसल्याने या जोडप्याने आत्महत्या केली असल्याचे कळते.
(संग्रहित दृश्य.)
आरोपीचा मृत्यू झाला असल्यामुळे गुन्हा बंद करण्याबाबतची प्रक्रिया लवकरच….
याप्रकरणी मृत काश्मिरा दोशी यांच्या मृत्यूचा अहवाल कांदिवली पोलिसांना प्राप्त झाला असून मृत्यूचा अहवालाच्या आधारावर पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपासात आरोपी जिग्नेश दोशीने कापडी पट्ट्याने प्रथम काश्मिरा दोशी यांचा गळा आवळून तिला ठार मारले. त्यानंतर स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात यश न आल्यामुळे जिग्नेश दोशीने कापडी पट्ट्याने शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत जिग्नेश दोशीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा मृत्यू झाला असल्यामुळे गुन्हा बंद करण्याबाबतची प्रक्रिया लवकरच करण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.