वसई – नायगाव येथून बेपत्ता असलेल्या ७५ वर्षीय किशोर मिश्रा यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी अल्पवयीन जोडप्याला अटक केली आहे. अल्पवयीन मुलगी हि मिश्रा यांच्या दुकानात काम करत होती. मिश्रा तिच्याशी लगट करत असल्याने चिडून मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिश्रा यांची हत्या केली. बोरीवलीत राहणारे किशोर मिश्रा (वय ७५) यांचे नायगावच्या टिवरी येथे दुकान होते. ते दि.१५ फेब्रुवारी पासून बेपत्ता होते. नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मिश्रा यांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज मध्ये मिश्रा हे १५ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या १६ वर्षीय मुलीसह नायगाव रेल्वे स्थानकात लोकल पकडताना दिसले. मात्र ते कोणत्या स्थानकात उतरले हे समजले नाही. मिश्रा यांचा मोबाईल दि.१६ रोजी बंद होता पण त्याचे लोकेशन भाईंदर परिसरात होते. त्यावरून पोलिसानी तपास संबंधीत मुलीकडे वळवला. मिश्रा यांच्या बॅक खात्यातून काही रक्कम या मुलीच्या खात्यात गेली होती. पुढे तांत्रिक तपास करून पोलिसांनी मुलीचा व मित्राचा शोध घेतला. ते दोघे हत्येनंतर नायगाव येथील एका खोलीत लपून राहिले होते.
(संग्रहित दृश्य.)
मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न….
दिड महिन्यापूर्वी मुलगी मिश्रा यांच्या दुकानात कामास लागली होती. तो कामादरम्यान तिच्याशी लगट करत होता. त्याने तिला ५ हजार पगार सांगूनही दिला नव्हता. त्यामुळे तिने मिश्रा यांच्या मोबाईलमधून काही रक्कम मित्राच्या तसेच बहिणीच्या नंबर वर पाठवली होती. मिश्रा पैसे परत मागून पोलिसात देण्याची भीती दाखवत होता. १५ फेब्रुवारी रोजी मिश्रा याने या मुलीला रिक्षात बसवून उत्तन येथे नेले. रिक्षात तो तिच्याशी लगट करत होता. त्यामुळे तिने रिक्षात असतानाच मोबाईलद्वारे आपल्या प्रियकरला संपर्क केला आणि आपले लोकेशन पाठवले. दरम्यान तो तिला उत्तन चौक येथील दर्गा जवळ घेऊन गेला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला. तिचा प्रियकर तिथे पोहोचला आणि त्याने मिश्रा यांच्या डोक्यात फरशी, दगड मारून हत्या केली व मृतदेह झुडपात फेकून दिला होता. बालेशाह पीर दर्गा येथील झुडपात मिश्रा यांचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपासाला वेग आला होता. नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद पवार तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे आदींच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. हा गुन्हा उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने तिथे वर्ग करण्यात आला आहे.