ठाणे : मुंबई येथे पत्नीची हत्या करून त्या प्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतर समशेर अली शहा याने त्याच्या दगडी पाट्याने हल्ला करत बहिण, भाऊ आणि आईच्या हत्येचा प्रयत्न केला. गावातील जागेचा हिस्सा आणि क्षुल्लक कारणावरून त्याने हा प्रकार केला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस समशेर अलीचा शोध घेत आहेत. समशेर अली हा मुंबई येथील शिवडीमध्ये राहत असताना. समशेर आलीने पत्नीची हत्या केली होती. याप्रकरणी त्याला शिक्षा झाली होती. कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर समशेर आली हा दोन महिन्यांपासून भिवंडी येथील गायत्रीनगर परिसरात त्याचे तीन भाऊ, आई, १५ वर्षीय बहिणीसोबत राहत होता. तो भिवंडी परिसरात वाहन चालवून उदरनिर्वाह करत होता. परंतु समशेर आली हा बहिणीला अत्यंत क्षुल्लक कारणांवरून मारहाण करत असे. दि.२३ मार्चला रात्री समशेर आलीच्या बहिणीने घरासमोर राहणाऱ्या एका मुलाकडून वडापाव मागितला होता. या कारणावरून त्याने तिला मारहाण केली होती. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्या कुटुंबियांनी वाद मिटविल्यानंतर समशेरअली हा घरातून निघून गेला होता. त्यानंतर रात्री उशीरा तो पुन्हा घरी आला. तसेच कुटुंबियांकडे उत्तरप्रदेश येथील त्यांच्या जागेचा हिस्सा मागू लागला. याबाबत सकाळी बोलू असे कुटुंबियांनी त्याला सांगितले.