बीड : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची बुधवारी (दि.२६ मार्च) सुनावणी पार पडली. परंतु या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण वाल्मीकच्या ३ चेल्यांकडून आम्हीच खून केल्याची कबुली देण्यात आली आहे. आरोपी सुदर्शन घुले, आरोपी जयराम चाटे आणि आरोपी महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या या कबुलीमुळे आता वाल्मीक कराड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वाल्मीक कराडच्या तीन चेल्यांची म्हणजेच आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून तिघांनीही आपणच सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या सुदर्शन घुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचेही सांगण्यात येत आहे. सुदर्शन घुलेने सुरुवातीला या हत्याप्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे नाकारत होता. मात्र पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडीओ दाखवल्यानंतर त्याने पटापट या संदर्भातील माहिती दिली. सुदर्शन घुले याने होय आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला अशी कबुली पोलिसांना दिली असल्याची माहिती समोर आली आहे.