मुंबई: औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन सोमवारी (दि.१७ ) नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर आता राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आक्रमक हिंदुत्त्वाचे नवे आयकॉन आणि चेहरा होऊ पाहत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे यांनी मंगळवारी (दि.१८) मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर नितेश राणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भेटले. मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर नितेश राणे त्यांच्या नेहमीच्या आवेशात दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली का असा प्रश्न विचारल्यानंतर नितेश राणे यांचा पारा काहीसा चढला. मी माझ्या मुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेलो होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझा हात हातात घेऊन हसले. तुम्ही तुमच्या बातम्या चालवा. मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आहे. माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतात याची चिंता तुम्ही करु नका. मी तुमच्या घरात डोकावतो का? मी इतर मंत्र्यांसारखा नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिला.