बीड : बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केलेल्या शिक्षक नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे व इतरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक धनंजय नागरगोजे यांना १८ वर्ष पगार मिळाला नाही म्हणून संस्था चालकासह इतर काही जणांचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून आत्महत्या केली होती. दरम्यान या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील आत्महत्या प्रकरणावरुन सरकारला सवाल केला आहे. तसेच, याप्रकरणी अद्यापही संस्थाचालकांवर गुन्हा का दाखल नाही. असा जाब दानवे यांनी विचारला. परिणामी विधान परिषदेत देखील याचे पडसाद उमटताच बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.