बुलढाणा : चौघा जणांनी अमानुष मारहाण आणि धारधार चाकूने सपासप वार केल्याने पित्याचा मृत्यू झाला. तर पुत्र गंभीर जखमी झाला आहे.गंभीर जखमी असलेल्या मुलावर अकोला येथे उपचार करण्यात येत आहे. खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे ही थारारक घटना घडली असून दोन कुटुंबातील जुना वाद नव्याने उफाळून आल्याने हे हत्याकांड झाले आहे. यामुळे शेलोडी गावासह खामगाव तालुका देखील अक्षरशः हादरला आहे. रघुनाथ गाडे असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा गोपाल गाडे गंभीर जखमी असून त्याला उपचारसाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्राप्त माहितीनुसार शेलोडी येथील रघुनाथ गाडे आणि पवन दशरथ बानाईत यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून जुना वाद सुरू होता. या वादातून पवन बानाईत याने रघुनाथ गाडे यांना एखाद्या दिवशी जीवे मारेल अशी धमकी दिली होती. गाडे व बाणाईत परिवारातील हा वाद आणखी उफळला. दरम्यान घटना प्रसंगी रात्री घरासमोर गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन्ही कुटुंबातील वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी पवन बानाईत याने धारदार शस्त्राने रघुनाथ गाडे यांच्यावर निर्घृणपणे सपासप वार केले.
(संग्रहित दृश्य.)
गाडे याची प्रकृती चिंताजनक
वडिलांना वाचवण्यासाठी आलेल्या गोपाल गाडे याच्या पोटातही शस्त्राने वार करून हल्लेखोरांनी त्यांना गंभीर जखमी केले. सदर घटना लक्षात येताच गाडे कुटुंबीयांनी जखमींना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच रघुनाथ गाडे यांचा मृत्यू झाला. तर गोपाल गाडे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारसाठी अकोला येथे हलविण्यात आले. त्याची प्रकृती अत्यवस्थ असून डॉक्टर त्याचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे समजते. या प्रकरणी मृत रघुनाथ गाडे यांचा पुतण्या मनोहर गाडे याने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी पवन दशरथ बानाईत, मनोरमा दशरथ बानाईत, दशरथ आत्माराम बानाईत, मोहन दशरथ बानाईत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (२), ३५१ (२) (३), ३ (५) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रांची पुसाम करत आहेत. या घटनेमुळे शेलोडी गावात तणाव निर्माण झाला असून खामगाव ग्रामीण पोलीस परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.