विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातलं वातावरण तापू लागलं आहे.एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असताना दुसरीकडे ओबीसी समाजाकडून कोट्याबाबत तीव्र विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका मांडली आहे. मात्र यावर शरद पवारांना प्रश्न विचारला असता भिडेंवर प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिला.
(संग्रहित दृश्य.)
प्रतिक्रिया देण्यास पवारांचा नकार !
शरद पवार यांनी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढवण्यात रस नसल्याची भूमिका मांडल्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावर, प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो, पण त्यांच्या मनात काय आहे माहिती नाही, अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना संभाजी भिडेंच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेबाबत विचारणा केली असता त्यावर प्रतिक्रिया देण्यास पवारांनी नकार दिला.
(संग्रहित दृश्य.)
काहीही प्रश्न विचारता का ?
संभाजी भिडेंबाबत प्रश्न सुरू होताच तो पूर्ण व्हायच्या आत शरद पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त करताना प्रतिक्रिया देणार नसल्याचं नमूद केलं. संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का ? काहीही प्रश्न विचारता का ? म्हणूनच मी तुम्हाला भेटायचं नाही मी म्हणत होतो. हल्ली कसेही प्रश्न विचारतात. एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक.. असं म्हणत शरद पवारांनी त्यांची प्रतिक्रिया आवरती घेतली.
(संग्रहित दृश्य.)
मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठलं काढलंय ?
संभाजी भिडे यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबाबतच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना मराठ्यांनी आरक्षणाचा आग्रह धरू नये असं म्हटलं होत. आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. आमच्या सांगवी गावात कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे. त्यात वाघ-सिंहांनी प्रवेश मागावा का ? एखाद्या ग्लायडिंग सेंटरमध्ये गरुडानं प्रवेश घ्यावा का ? स्वीमिंग क्लबमध्ये माशानं प्रवेश मागावा का ? मराठ्यांनी आरक्षण मागावं का ? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठलं काढलंय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सिंहानं सबंध जंगल सांभाळायचंय. पृथ्वीवरच्या संपूर्ण सागरात माशांनी फिरायचं स्वीमिंग क्लबला जायचं नाही. गरुडांनी ग्लायडिंग क्लबमध्ये जायचं नाही. मराठा जात सबंध देशाचा संसार चालवणारी आहे. हे ज्या दिवशी मराठ्यांच्या लक्षात येईल, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून निघेल. हे त्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैवं आहे असं भिडे यांनी नमूद केलं आहे.