Reading:भाजपा आमदाराने मंत्री असतांना विधानसभेत आणि सरकारी वाहनात अनेकवेळा बलात्कार केला असल्याचा पीडितेचा गंभीर आरोप. त्या आमदाराला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
भाजपा आमदाराने मंत्री असतांना विधानसभेत आणि सरकारी वाहनात अनेकवेळा बलात्कार केला असल्याचा पीडितेचा गंभीर आरोप. त्या आमदाराला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | KARNATAKA | BJP | RAPE CASE FILED AGAINST BJP MLA | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
कर्नाटकमधील भाजपाचे आमदार एन. मुनिरत्न नायडू यांनी वारंवार बलात्कार करून हनीट्रॅप करण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप एका महिलेने केला असल्याची बातमी पीटीआयने दिली आहे. या महिलेने तक्रार दाखल केली आहे. आमदारांनी विविध ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. कर्नाटक विधानसभेची इमारत आणि सरकारी वाहनात अनेकवेळा बलात्कार झाला असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. तसेच ही घटना उघड केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आमदारांनी दिली होती असेही पीडित महिलेने सांगितले आहे.
(संग्रहित दृश्य.)
आमदारांसह आणखी सहा जणांवर बलात्काराचा गुन्हा.
मुनिरत्न यांनी २०२० ते २०२३ या काळात तसेच ते मंत्री असताना ऑगस्ट २०२१ ते मे २०२३ या काळातही वारंवार बलात्कार केला असल्याचा गंभीर आरोप पिडीतेने केला आहे. यानंतर मागच्या शनिवारी (१४ सप्टेंबर) विशेष न्यायालयाने मुनिरत्न नायडू यांना बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि गुन्हेगारी कारवाई या गुन्ह्यासाठी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर पोलिसांनी त्यांची रवानगी परप्पाना अग्रहारा येथील मध्यवर्ती कारागृहात केली आहे. काग्गलीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोडणाऱ्या एका खासगी रिसॉर्टमध्ये बलात्काराची घटना घडल्यानंतर ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आमदारांसह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
(संग्रहित दृश्य.)
काँग्रेसतर्फे विधानसभा इमारतीचे शुद्धिकरण करण्यात येणार होते. पण….
आमदार मुनिरत्न यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. सदर आरोप झाल्यानंतर काँग्रेसतर्फे विधानसभा इमारतीचे शुद्धिकरण करण्यात येणार होते. पण पोलिसांनी काँग्रेस नेते मनोहर यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन होऊ दिले नाही, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. आमदारांनी त्यांना विविध खासगी रिसॉर्टमध्ये हनीट्रॅप करण्यासाठी बळजबरी केली. जर मी हे काम केले नाही, तर मला ठार केले जाईल, अशी धमकी त्यांनी दिली होती. या कामात आमदारांचे बॉडीगार्ड आणि त्यांचे सहकारीही गुंतले असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
मुनिरत्ना नायडू हे कर्नाटकमधील राजराजेश्वरी नगरमधील भारतीय जतना पक्षाचे आमदार आहेत. मुनिरत्न यांची पार्श्वभूमी नेहमीच वादाची राहिली आहे. मार्च २०२३ मध्ये पोलिसांनी मुनिरत्ना नायडू यांच्यावर ख्रिश्चनांच्या विरोधात द्वेषयुक्त भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मुनिरत्न नायडू यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात उत्तर बंगळुरूमधील यशवंतपूर येथून नगरसेवक म्हणून केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर राजराजेश्वरीनगर मतदारसंघात त्यांचे वर्चस्व राहिले आहे. मुनिरत्ना नायडू हे दोनदा २०१३ आणि २०१८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर एका वर्षानंतर भाजपाचे उमेदवार म्हणून पोटनिवडणूक जिंकली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांना फलोत्पादन मंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.