सांगली : भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी समर्थकासह कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्षांच्या घरात घुसून मारहाण केल्याची घटना शुक्रवार (दि.२७ सप्टेंबर) सकाळी घडली आहे. मात्र मारहाण झाल्याची कबुली देत आपल्या स्वीय सहायकाला तिघांनी काल रात्री मारहाण केल्याचा दावाही माजी खासदार संजय पाटील यांनी केला आहे. या घटनेप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी केलेल्या तक्रारीनुसार माजी खासदार संजय पाटील यांनी समर्थकासह घरात घुसून मारहाण केली. तसेच घरातील महिला व मुलांनाही मारहाण केल्याचा दावा अय्याज मुल्ला त्यांनी केला आहे. मारहाणीपासून वाचविण्यासाठी पुढे आलेल्या ७६ वर्षाच्या आईलाही माजी खासदारांनी ढकलून दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली आहे.
(संग्रहित दृश्य.)
गुंडगिरी विरूध्द शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध सभेचे आयोजन.
या घटनेबाबत माजी खासदार संजय पाटील यांनी सांगितले कि शुक्रवारी रात्री स्वीय सहायक खंडू होवाळे यांना अय्याज मुल्ला, बाळासाहेब पाटील व पिंटू कोळेकर या तिघांनी मारहाण केली होती. ही माहिती मिळताच आज विचारणा करण्यासाठी मी अय्याज मुल्ला यांच्या घरी गेलो होतो. मात्र त्यांची भाषा अर्वाच्च व ताणून मारण्याची होती. यामुळे संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने दोन थोबाडीत लगावल्या. होवाळे याला झालेल्या मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान अय्याज मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी खासदार संजय पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गट आक्रमक झाला असून आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांच्यासह जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून बसला होते. या प्रकारावरून कवठेमहांकाळमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलीस बंबोबस्त वाढविण्यात आला आहे. आमदार सुमन पाटील व रोहित पाटील हे कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात जमले आहेत. गुंडगिरी विरूध्द शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी माध्यमांना दिली आहे.