नागपूर : विवाहित महिलेसोबत सूत जुळल्यानंतर प्रियकराने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यासाठी तिला पतीकडून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्या महिलेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र तिला लग्नास नकार दिला. या प्रकरणी सदर पोलिसांनी पीडित ३७ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. आलोक राजेंद्र सिंग (वय ३९) रा. मानकापूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलोक सिंग हा कॅटरिंगचा व्यवसाय करतो. पीडित महिला पतीसह सुखी संसार करत असताना आरोपी लोकेश याची तिच्याशी ओळख झाली. काही दिवसातच दोघांचे सूत जुळले दोघांचे प्रेम प्रकरण सुरू असताना त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोघांचेही प्रेम प्रकरण पुढे वाढत गेले. ती विवाहित असल्यामुळे तिला नेहमी भेटायला येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आरोपी अलोक याने तिला लग्नाचे आमिष दाखवले त्यासाठी पतीपासून तिला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यास सांगितले. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती मुलीसोबत बेलतरोडी ठाण्यांतर्गत राहायला आली. एका खासगी कंपनीत काम करून ती स्वत:सह मुलीचा उदरनिर्वाह करते. जवळपास ८वर्षांपूर्वी महिलेची आलोकशी ओळख होती. आज ना उद्या तो लग्न करेल या आशेवर ती होती. आलोक ने मात्र तिच्याशी लग्न न करता तिला काही दिवस लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये सोबत ठेवले. आलोकने बेलतरोडी आणि सदर परिसरातील हॉटेलमध्ये नेऊन महिलेशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. गत काही दिवसांपासून त्याने महिलेपासून दुरावा केला होता. तो सतत तिला टाळत होता. महिलेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता आलोकने स्पष्ट नकार दिला. महिलेने घटनेची तक्रार बेलतरोडी पोलिसात दिली. मात्र घटनास्थळ वेगळे असल्यामुळे सदर ठाण्यात तक्रार करण्यात आली. सदर पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तात्काळ लैंगिक अत्याचार आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून आलोकला अटक केली.