दिल्लीतील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना या दिल्ली पोलिसांसाठी व दिल्लीकरांसाठी देखील चिंत्तेचा विषय ठरू लागला आहे. नुकतीच दिल्लीत एका ब्रिटिश तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर मैत्री झालेल्या एका तरुणाला भेटण्यासाठी ही ब्रिटिश तरुणी भारतात आली होती. मात्र दिल्लीत त्याला भेटल्यानंतर आरोपीनं तरुणीवर बलात्कार केला. दिल्ली पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या महिपालपूर भागात मंगळवारी (दि.११ ) संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. पीडित ब्रिटिश तरुणीची इन्स्टाग्रामवर आरोपीशी ओळख झाली होती. आरोपीचं नाव कैलाश असल्याचं हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. आरोपीला इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याचा छंद आहे. त्याचसंदर्भात पीडित तरुणीची आरोपीशी ओळख झाली. ब्रिटिश तरुणी भारतात महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर आली असता या तरुणाला भेटण्यासाठी तिने फोन केला. पण आपण महाराष्ट्रात येऊ शकत नसल्याचं सांगून आरोपीने तरुणीला दिल्लीत येण्याची विनंती केली. आरोपीशी इन्स्टाग्रामवर चांगली मैत्री झाल्यामुळे तरुणी त्याच्या विनंतीवरून दिल्लीत त्याला भेटण्यासाठी तयार झाली.
(संग्रहित दृश्य.)
आरोपीच्य मित्राने तरुणीचा विनयभंग केल्याचा दावा…
दरम्यान पीडित तरुणी दिल्लीत आल्यानंतर महिपालपूर भागातील एका हॉटेलमध्ये तिने रूम बुक केली. आरोपीला तिथे भेटण्यासाठी बोलावलं. आरोपी त्याचा मित्र वासिमला घेऊन तरुणीला भेटण्यासाठी आला. हॉटेलमध्ये त्या तिघांनी मद्यप्राशनही केलं. यानंतर तरुणीला सोडण्याच्या बहाण्याने आरोपी तिच्या रुममध्ये गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर तरुणीनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. असता आरोपीने त्याचा मित्र वासिमलाही रुममध्ये बोलावलं. यानंतर वासिमनं तरुणीचा विनयभंग केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या सगळ्या प्रकाराची माहिती ब्रिटिश दूतावासाला देण्यात आल्याचंही दिल्ली पोलिसांनी सांगितलं.