कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरामध्ये वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्यासाठी तिच्या तोंडात बोळा कोंबून व गळा दाबून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . शोभा सदाशिव धनवडे (वय ६२,रा.कचरा डेपोजवळ, गडहिंग्लज) असे या महिलेचे नाव आहे. सोलापुरे वसाहतीजवळील विहिरीत तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला व डाव्या बाजूला गळावलेला व्रण अशा स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि.२२) संध्याकाळी त्या घरातून निघून गेल्या होत्या. त्यांच्या अंगावरील दागिने काढून , त्यांचा खून करून त्यांना विहिरीत ढकलून देण्यात आले. मात्र, विहिरीच्या काठावरील झाडाला मृतदेह अडकला होता.
(संग्रहित दृश्य.)
मध्यरात्री बेपत्ता असल्याची दिली तक्रार….
रविवारी (दि.२३) सकाळी ही घटना उघडकीस आली असता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास वेगाने सुरू केला आहे. पोलिसांनी अनोखळी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मयत शोभा धनवडे यांचे पती सदाशिव आणि मुलगा मारुतीसह धान्याचे दुकान चालवतात. शनिवारी रात्री सदाशिव धनवडे यांना पत्नी शोभा या दिसत नसल्याने मुलगा मारुतीला त्यांनी माहिती दिली. यानंतर शोभा धनवडे यांची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान मारुतीने सर्वत्र फोन करून चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र शोभा धनवडे यांची कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास मुलगा मारुतीने पोलिसांना आई बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. रविवारी सकाळी त्यांचा घरी काम करत असणाऱ्या मावशीकडे सुद्धा चौकशी करण्यात आली. मात्र तिथेही त्यांची काही माहिती मिळाली नाही. त्यामुळे आईचा शोध घेत असताना एका शेतातील विहिरीच्या बाजूला एक नॅपकिन, बाजूला चप्पल आणि मोबाईलचा काळसर रंगाचा कव्हर दिसून आला. मात्र, त्यामध्ये मोबाईल नव्हता आणि विहिरीत वाकून पाहिले असता विहारीतील कडेला झुडपामध्ये अडकलेला मृतदेह दिसून आला. यानंतर पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली.
(संग्रहित दृश्य.)
अंगावरील दागिने गायब, तोंडात कापडाचा बोळा.
मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शोभा धनवडे यांचा असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा होता व डाव्या बाजूला गळावलेला व्रण दिसून आला. त्यांच्या अंगावरील सहा तोळ्याचे गंठण, अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र, सात ग्रॅम आणि आठ ग्रँमची प्रत्येकी एक अंगठी, कानातील एक तोळ्याची कर्णफुली दिसून आली नाहीत. त्यामुळे या दागिन्यांसाठी गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले.