अहिल्यानगर : जामखेड शहरातील बीड रस्त्यावर चारचाकी मोटार वाहन रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्यानंतर, मोटारीने पेट घेतला आहे. या अपघातात जामखेड पोलिस ठाण्यातील कर्मचार्यासह आणखी एका तरुणाचा जळुन मुत्यू झाला आहे. हा अपघात आज, सोमवार (दि.२४) पहाटे घडला आहे. धनंजय नरेश गुडवाल, (३५ वर्षे ) व महादेव दत्ताराम काळे, (२८ वर्षे, रा. आदित्य मंगल कार्यालय शेजारी, बीड रस्ता जामखेड) अशी दोघा मृतांची नावे असल्याची माहिती जामखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे. महादेव काळे व पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल हे दोघे आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनातून (एमएच १६ डीएम ३८५३) जामखेड शहराकडे येत होते. वाहन एका हॉटेलसमोरील दुभाजकाला धडकली चारचाकी वाहनाने पेट घेतला. अत्याधुनिक पध्दतीमुळे चारचाकीचे दरवाजे लॉक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दोघांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. त्यातच दोघांचा जळुन दुर्दैवी मुत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
(संग्रहित दृश्य.)
कार्यकर्ते व पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी घेतली धाव….
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्या घटनास्थळी आले. यानंतर जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जामखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने हि आग विझवली. अग्नीशमन दलाचे आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या जवानांनी त्यासाठी प्रयत्न केले. चारचाकी वाहन पूर्ण जळुन खाक झाले आहे. तर या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले. अपघातील मृत महेश काळे याचे बीड रस्त्यावर साईनाथ पान शॉप दुकान आहे. अधिक तपास तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.
(संग्रहित दृश्य.)
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी….
जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून अपुर्ण आहे. रस्त्यांवरील खड्डे , दिशादर्शक फलक, तसेच रेडियम कुठेही नाहीत, मधेच काही ठिकाणी डिव्हाइडर तसेच डिव्हाइडरसाठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होत आहेत. यामुळे लवकरात लवकर जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.