RAKSHA KHADSE NEWS :विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर केंद्रीय मंत्र्याची मुलगीच सुरक्षित नसेल तर इतर मुलींचे काय ? असा उद्विग्न सवाल करत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यासाठी विरोधकांच्या हाती नवे अस्त्र पडले आहे. आपल्या मुलीबरोबर छेडछाड झाल्याची तक्रार करण्यासाठी खुद्द मंत्र्यांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले असताना असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवार (दि.३ मार्च) पासून सुरुवात होणार आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या, स्वारगेट बलात्कार आदी घटनांवरून गृहखात्यावर विरोधक आधीपासून टीका करीत आहेत. रक्षा खडसे यांनी मुलीच्या छेडछाडीवरून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांना आयते कोलीत दिल्याने भाजपची पंचाईत झाली असल्याचे एकंदरीत चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगरजवळील कोथडी येथे एका यात्रेदरम्यान केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची एका टोळक्याने छेड काढल्याची तक्रार आहे. मुलींसोबत असलेल्या पोलीस सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की करण्यात आली. सुरक्षारक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या घटनेला दोन दिवस होऊनही कुणालाही अटक करण्यात न आल्याने रक्षा खडसे यांनी रविवारी (दि.२ मार्च) थेट पोलीस ठाणे गाठले व अधिकाऱ्यांना जाब विचारला. केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर इतरांचे काय ? असा प्रश्न उपस्थित करत बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरून आपल्याच पक्षाच्या सरकारला खडसेंनी घरचा आहेर दिला आहे. खडसे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर अनिकेत भोई, पीयूष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी या संशयितांविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत भोई याच्यावर यापूर्वी विविध कलमांखाली चार गुन्हे दाखल असले तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली आहे.
(मंत्री रक्षा खडसे पोलीस ठाण्यातील दृश्य.)
मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात….
मुक्ताईनगर मतदारसंघात अलीकडच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे. त्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचा राजाश्रय कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. छेडछाडीचा मुद्दा हा केवळ आपल्या घरचा नसून, व्यापक असल्याचे ते म्हणाले. खडसे यांचा रोख हा शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक आमदाराकडे असल्याचे असतानाच आरोपी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्रीय मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करणार आहे.केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी म्हंटले आहे.