TIMES OF NAGAR
अलिबाग : रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथे नदी किनारी एका सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथे उग्र वास येत होता. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे त्यांनी आसपासच्या परिसरात कुठले जनावर मरून पडले आहे का याचा शोध सुरू केला. तेव्हा बाळगंगा नदी किनारी एक भलीमोठी काळी सुटकेस आढळून आली. याच सुटकेसमधून उग्रवास येत होता. दुरशेत गावचे सरपंच दशरत गावंड यांनी तात्काळ गावच्या पोलीस पाटलांना बोलावून घेतले. त्यानंतर पेण पोलीसांना या घटनेची माहिती दिली. काही वेळात पोलीसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुटकेस उघडून पाहिली असता त्यात साधारणपणे ३० ते ४० वयोगटातील महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सुटकेस मध्ये आढळून आला. त्यामुळे पेण परिसरात खळबळ उडाली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. साधारणपणे चार ते पाच दिवसांपूर्वी या महिलेचा खून करून मृतदेह बॅग मध्ये भरून दूरशेत येथे टाकण्यात आला असावा असा अंदाज पोलीसांकडून व्यक्त केला जात आहे. काही वर्षांपूर्वी शिना बोरा हीची हत्या करून तिचा मृतदेह अशाच पध्दतीने पेण येथील गागोदे परिसरातील जंगलात आणून तो जाळला गेला होता. तर नवीमुबईतील दोन व्यवसायिकांची हत्याकरून त्यांचे मृतदेह देखील रायगड जिल्ह्यात महामार्गालगतच्या परिसरात टाकण्यात आले होते. सतत होणाऱ्या या घटनामुळे पेण परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. या घटनेचा सखोल तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे.