Reading:पुणे बलात्कार प्रकार ; आता आरोपीच्या मैत्रिणीसह,आई-वडील व भावाची चौकशी,आरोपीला शोधण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडव तर आरोपीची माहिती देणाऱ्यास लाखांचे बक्षीस ?
पुणे बलात्कार प्रकार ; आता आरोपीच्या मैत्रिणीसह,आई-वडील व भावाची चौकशी,आरोपीला शोधण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडव तर आरोपीची माहिती देणाऱ्यास लाखांचे बक्षीस ?
PUNE RAPE CASE SWARGET NEWS : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकावर एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२६) सकाळी उजेडात आली आहे. या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल १ लाखांचंही बक्षिस जाहीर केलं असून त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेले २३ सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले आहे.पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील तपास अहवाल, फिर्यादीची प्रत तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
(संग्रहित दृश्य.)
आई-वडील आणि भावाची चौकशी.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडे याच्या मित्रांची पोलिसांकडून बुधवारी (दि.२६) रात्री चौकशी करण्यात आली आहे.दत्तात्रय गाडे याचे आई-वडील आणि भावाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. स्वारगेट एसटी बस स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून आरोपीने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार केला आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२५ ) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. परगावी निघालेल्या तरुणीवर आरोपीने बलात्कार केला होता. याप्रकरणी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि.पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २६ वर्षीय पीडित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. आरोपी पसार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, तसेच स्वारगेट पोलिसांनी १३ पथके तयार केली आहेत. आरोपीच्या संपर्कात असलेल्या दहा मित्रांची बुधवारी पोलिसांनी रात्री चौकशी केली आहे. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीचे आई-वडील आणि भावाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांना चौकशीसाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
(संग्रहित दृश्य.)
बसची फाॅरेन्सिक एक्सपर्ट तपासणी होणार ….
गाडेची मैत्रीण भोर तालुक्यात राहायला आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली. चौकशीत गाडेने मैत्रिणीकडे तिच्या संपर्कात असलेल्या मैत्रिणींचे मोबाइल क्रमांक मागितले होते. त्यांनाही त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. गाडेने आणखी काही तरुणींना त्रास दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. आरोपी गाडेचा स्वारगेट एसटी बस स्थानकात वावर असायचा. मंगळवारी (दि.२५) सकाळी परगावी निघालेल्या तरुणीकडे त्याने एसटीतील वाहक असल्याची बतावणी केली आहे. ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर बलात्कार केला. त्या बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून (फाॅरेन्सिक एक्सपर्ट) तपासणी करण्यात येणार आहे. एसटी बस न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. संबंधित बसचालकाचा पोलिसांकडून जबाब नोंदविण्यात आला आहे.