नागपूर : प्रेमविवाहानंतर पतीला दारूचे व्यसन लागल्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी दोन मुलांसह माहेरी निघून गेली आणि खासगी नोकरी करून दोन्ही मुलांचा सांभाळ करायला लागली. मात्र,पतीचे जास्त दारू पिल्यामुळे निधन झाल्याचा निरोप पत्नीला मिळाला. महिला दोन्ही मुलांना घेऊन पतीच्या अंत्यदर्शनासाठी पोहचली. मात्र, सासरच्या मंडळींनी तिला अंत्यसंस्कारापासून रोखल्यामुळे हा वाद भरोसा सेलपर्यंत पोहचला. पोलिसांनी दोघांचीही बाजू ऐकून घेत दुःखद स्थितीतही तोडगा काढल्याने वाद निवळला. तनुश्री ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जयळ्यातील आशीषच्या प्रेमात पडली होती. शिक्षण पूर्ण होताच दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तनुश्रीच्या श्रीमंत वडिलांनी प्रेमविवाहास नकार दिला. तनुश्रीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन आशीष बरोबर प्रेमविवाह केला.आशीष एका कंपनीत नोकरीवर लागला. कालांतराने त्यांना एक मुलगा व मुलगी झाली. मात्र, १० वर्षे सुरळीत संसार सुरू असताना आशीषला दारूचे व्यसन लागले. तो दारूच्या व्यसनात एवढा बुडाला की त्याची नोकरी गेली. त्याने तनुश्रीला नोकरी करण्यास भाग पाडले. तिच्या पगाराच्या पैशाने हि तो दारू प्यायला लागला. तानुश्रीचा शारीरिक व मानसिक त्रास वाढल्यामुळे ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. दारूच्या व्यसनामुळे आशीषचा भाऊ व बहिणीसह वडिलांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. रविवारी (दि.२३) जानेवारीला जास्त दारू पिल्यामुळे घरातच आशिषचा मृत्यू झाला. दोन दिवसानंतर शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी आल्यानंतर आशीषचे निधन झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आशीषचे वडील, भाऊ, बहिणीसह अन्य नातेवाईक जमा झाले. त्यांनी सुनेला न कळवता अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. दरम्यान, तनुश्रीला पतीचे निधन झाल्याचा निरोप मिळाला. ती दोन्ही मुले, आई-वडील आणि भावंडांसह अंत्यदर्शनाला पोहचली.

विनापरवाना अंत्यविधी; आठ जणांवर गुन्हा दाखल(संग्रहित दृश्य.) 

वडिलांचा चेहरा पाहण्याची शेटवची संधी….

तनुश्रीला दोन्ही मुलांसह व तिचा माहेरच्या मंडळी सोबत बघताच ७० वर्षीय सासऱ्यांच्या मनात भलतेच काही सुरू झाले होते. पतीच्या निधनानंतर त्याची संपत्ती हडपण्याच्या उद्देशाने तनुश्री आल्याचा संशय त्यांना आला. मुलाच्या अंत्यसंस्कारापूर्वीच वृद्ध सासऱ्याने सुनेशी वाद घालायला सुरवात केली. संपत्तीतील एक रुपयाही मी सुनेला देणार नाही. माझ्या संपत्तीवर सुनेचा किंवा तिच्या मुलांचा काही अधिकार नाही. असा वाद घालून सासऱ्याने गोंधळ घातला. काही नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यामुळे तनुश्री व तिच्या मुलांना पतीचे अंत्यदर्शन करता आले. ७० वर्षीय सासऱ्याने सुनेविरुद्ध भरोसा सेलमध्ये तक्रार केली. संपत्तीमध्ये हिस्सा मागण्यासाठीच ती कटकारस्थान रचत असून माझ्या जीवाला धोका आहे, असा आरोप सासऱ्याने सुनेवर केला . पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी डाकेवाड आणि अंमलदार रोशनी बोरकर यांनी वृद्धाची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर सुनेला बोलावण्यात आले. तेव्हा सून म्हणाली कि मला फक्त माझ्या पतीचे अंत्यदर्शन घ्यायचे होते. माझ्या मुलांना वडिलांचा चेहरा पाहण्याची शेटवची संधी होती. सासऱ्यांनी गैरसमजातून माझ्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे सर्व संपत्ती सासऱ्यांनाच देण्यात यावी,अशी सुनेने भूमिका मांडली. सुनेचे हे  शब्द ऐकून तेथे उपस्थित सासऱ्यांच्या डोळ्यात अश्रू  अनावर आले.