सांगली : विशेष पोलीस महानिरीक्षक सांगली दौऱ्यावर असतानाच महापालिका क्षेत्रात घातक हत्याराने खून करण्याचे प्रकार रविवारी (दि.२३) रात्री घडले. एका घटनेत सांगलीतील आयर्विन पुलाजवळ विवाहित महिलेचा पतीने, तर दुसऱ्या घटनेत मिरजेतील कमानवेसमध्ये मोकातून सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचा खून झाला. सांगली शहरात आयर्विन पुलाखाली पतीकडून पत्नीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये प्रियांका चव्हाण हिचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रियांका चव्हाण व तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वाद असल्याने प्रियांका चव्हाण या माहेरी सांगलीवाडी येथे गेल्या त्या चार महिन्यांपासून तेथे राहत होत्या. तिला भेटण्यासाठी तिचा पती आज सांगलीत आला होता. त्याने तिला आयर्विन पुलाजवळ नेले. त्या ठिकाणी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर प्रियांका हिच्या पतीने तिच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून तिचा खून केला.
(संग्रहित दृश्य.)
जकाप्पाला दारूचे व्यसन होते…..
रात्री नऊच्या सुमारास आयर्विन पुलाखाली हा प्रकार घडला आहे. या हल्ल्यानंतर पती जकाप्पा चव्हाण हा पसार झाला असून, सध्या त्याचा शोध सुरू आहे. जकाप्पा चव्हाण याला दारूचे व्यसन होते. दोघांमध्ये सतत वाद होत होता, म्हणून प्रियांका माहेरी आली होती. परंतु, प्रियांका माहेरी राहत असली तरी जकाप्पा हा तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. या संशयातून त्याने तिचा खून केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. मिरज शहरात कोयता गॅंग मधील दोन गटात झालेल्या राड्यामध्ये कोयता गॅंग मधील सराईत गुन्हेगार कुणाल वाली याच्यावर कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. तसेच मृत कुणाल वाली याचा भाऊ वंश वाली याच्यावर देखील टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
(संग्रहित दृश्य.)
छातीवर पोटावर वार झाल्याने कुणाल जागीच ठार
याप्रकरणी पोलिसांनी चार संशयित हल्लेखोरांना रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे कोयता गॅंगमधील वाद आणखीन पेटण्याची शक्यता आहे.मिरजमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन गटात राडा सुरू होता. यातून एकमेकांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. कुणाल वाली व त्याचा भाऊ वंश वाली हे दोघे रविवारी रात्री कमानवेस मधून जात होते. यावेळी हल्लेखोराने दोघांना अडविल्याने दोघात वाद झाला. यातून हल्लेखोराने कुणाल वाली व वंश वाली या दोघांवर कोयत्याने हल्ला केला. छातीवर पोटावर कोयत्याने वार झाल्याने कुणाल वाली जागीच ठार झाला. तर वंश वाली हा गंभीर जखमी झाला आहे. वंश वाली याच्यावर मिरज जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी वार्षिक तपासणीच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर आहेत. केवळ २४ तासात खूनाच्या तीन घटना शहरात घडल्याने सांगली हादरली आहे.