हावडा जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी फटाके फोडताना आग लागल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना उलुबेरियाच्या बाजारपारा भागात घडली आहे. तानिया मिस्त्री (१४), इशान धारा (६) आणि मुमताज खातून (८) अशी पीडितांची नावे आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, उलुबेरिया नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये लहान मुलांसह काही स्थानिक रहिवासी फटाके फोडत होते. फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे जवळच ठेवलेले आणखी फटाके पेटले, ज्यामुळे शेजारच्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला आणि कुटुंबातील सदस्य अडकले. या घरात तीन लहान मुलं होती. आग लागल्यानंतर ते आगीत होरपळले. तिघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत आणखी दोन मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उलुबेरिया मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे घर काजल शेख यांचे होते आणि तीन मुलांपैकी एक त्यांच्या कुटुंबातील होते तर इतर शेजारी होते.
(संग्रहित दृश्य.)
या घटनेनंतर शहरात शोककळा पसरली.
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री आणि बंगाल भाजपाचे प्रमुख सुकांता मजुमदार यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “दिवाळीच्या सणामध्ये ही घटना हृदयद्रावक आहे. या परिस्थितीत मी त्यांच्या शोकाकुल पालक आणि कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहावे. त्याचवेळी मी प्रशासनाकडे संपूर्ण चौकशीची मागणी करतो. या घटनेनंतर शहरात शोककळा पसरली आहे.
(संग्रहित दृश्य.)
इमारतीच्या ३० व्या मजल्यावर आग.
दरम्यान, गोरेगाव येथील हब मॉलजवळील लोढा फियोरेन्जा इमारतीला आगल लागल्याची घटना घडली आहे. सायंकाळी ७.३५ दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाली. इमारतीच्या ३० व्या मजल्यावर स्तर -१ ची आग लागली होती. अग्निशमन दलासह मुंबई पोलीस आणि अदाणी पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. याही घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.