तुम्ही आम्हाला हप्ता का देत नाही आम्ही या एरियाचे भाई आहोत. जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुमचे दुकान चालू देणार नाही. तुम्हाला राहू देणार नाही. तुझ्या नवर्याला ठार मारू असे म्हणत संशयित दोघांनी दुकानातील काचेची तोडफोड करून सुमारे ८ हजार रुपये बळजबरीने घेतले. ही घटना दि.९ एप्रिल २०२५ रोजी नानाज कॉर्नर सामनगाव रोड, पॉलिटेक्निक कॉलेजजवळ, नाशिकरोड येथे घडली. याप्रकरणी अश्विनी अमोल पंडीत यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी कुणाल सूर्यवंशी, कृष्णा चव्हाण (रा. सामनगाव रोड, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार अश्विनी पंडीत दि. ९ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता त्यांच्या किराणा दुकानात होत्या. त्यावेळी संशयित कुणाल सूर्यवंशी आला. त्याने पंडीत यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र पंडीत यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने कुणला सूर्यवंशी याने अश्विनी सूर्यवंशी यांना शिवीगाळ करून त्यांच्या दुकानाच्या काऊंटरवर लाथा मारल्या. त्यानंतर त्या दुकान बंद करत असताना पुन्हा कुणाल सूर्यवंशी व कृष्णा चव्हाण आला. संशयितांनी तुम्ही आम्हाला हप्ता का देत नाही आम्ही या एरियाचे भाई आहोत. जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुमचं दुकान चालू देणार नाही. तुम्हाला राहू देणार नाही. तुझ्या नवर्याला ठार मारू, असे म्हणत संशयित दोघांनी दुकानातील काचेची तोडफोड करून सुमारे ८ हजार रुपये बळजबरीने घेतले. त्यानंतर संशयितांनी दुकानावर दगडफेक केली. ही बाब परिसरातील नागरिकांना समजली ते दुकानाजवळ आले. त्यावेळी संशयितांनी त्यांनाही शिवीगाळ करून आरडाओरड केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.