नाशिक : फुलेनगर येथे जादूटोण्याच्या संशयावरून कुरापत काढून दोन तरुणांनी एका ४० वर्षीय व्यक्तीचा विटांनी ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.०२) पहाटे घडली आहे. संजय तुळशीराम सासे (वय ४०, रा. फुलेनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ रोडवरील फुलेनगरमधील मनपा शाळेच्या पाठीमागे विशाल क्षीरसागर आणि धीरज सकट या दोघांनी संजय सासे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, रविवारी सायंकाळपासून हे तिघे एकत्रच फिरत होते. या घटनेनंतर पंचवटी पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे.
(संग्रहित दृश्य.)
जादूटोण्याने घेतला बळी ?
विशाल क्षीरसागर याचा भाऊ प्रमोद क्षीरसागर याचा आठ महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्या मृत्यूमागे संजय सासे याचा हात असल्याचा संशय विशालला होता. सासे यांनी काहीतरी जडीबुटी खाऊ घातली होती, त्यामुळेच त्याच्या भावाचा मृत्यू झाला, असा त्याचा समज होता. त्यासोबतच सासे यांनी जादूटोणा आणि अघोरी कृत्ये केली असावीत, असा संशयही असल्याचं त्याने पोलिसांना चौकशीवेळी सांगितलं आहे. संजय सासे यांच्या पत्नी रूपाली संजय सासे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, अशा अंधश्रद्धेमुळे घडणाऱ्या हिंसक घटनांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महापालिकेच्या ५६ नंबर शाळेजवळील प्रवीण किराणा दुकानाजवळ घडली.संजय सासे हे ‘बाबागिरी’ करत असल्याचा संशय होता, अशी माहिती स्थानिकांनी देखील दिली आहे. सोमवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी संजय सासे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून त्यांचा निर्घृण खून केला. या प्रकरणी संजय सासे यांची पत्नी रुपाली संजय सासे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.