परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचे आता पुढे आले आहे. न्याय दंडाधिका-यांचा चौकशीचा अहवाल आता हाती लागला असून परभणी जिल्ह्यातील नवामोंदा पोलीस ठाण्यातील मारहाणाचं प्रकरण नव्याने चर्चेत आले आहे. दरम्यान न्यायदंडाधिकाऱ्यांचा ४५१ पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे. आयोगानेही त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलीसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा १५ डिसेंबर रोजी पोलीस कोठडीत असताना तुरुंगात मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण तापलेलं आहे. तर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीतच हा मृत्यू झाला आहे. त्या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशींच्या शरीरावर अनेक जखमाही होत्या. असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय. मात्र राज्य सरकारनं अद्याप एकाही पोलीस अधिका-यावर कारवाई केलेली नाही. परिणामी आम्हाला सरकारची मदत नको पण दोषींवर कारवाई हवी आहे. अशी ठाम भूमिका सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी घेतली आहे. तर दोषी पोलीसांवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबिय सातत्यानं करत आहेत.