अहमदनगर एलसीबीला हवा असलेला फरार आरोपी पुणे पोलिसांच्या गळाला.
अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोड्यांसारखे गुन्हे दाखल असलेला हंसराज रणजीतसिंग टाक रा.हडपसर याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांच्या पथकावर गोळीबार करुन पसार झालेल्या दरोडेखाेराला पकडण्यासाठी सोलापूर आणि अहमदनगर पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते. हडपसर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा सापळा रचून त्याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेतील युनिट सहाचे पथक हडपसर भागात गस्त घालत होते. त्यावेळी हंसराज रणजीतसिंग टाक (वय १८, रा. हडपसर) हा कॅनोल रस्ता परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी नितीन मुंढे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून हंसराज रणजीतसिंग टाक याला ताब्यात घेतले. त्याने पुणे शहरातील हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे चौकशीत उघडकीस आले. त्याने नऊ गुन्हे केल्याचे चौकशीत उघडकीस आले असून, सहा लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.