Reading:आपल्या (मुस्लीम) समाजाची रॅली होती तेव्हा जाणीवपूर्वक त्याला (अक्षय शिंदे) पोलिसांनी मारलं आहे. जितेंद्र आव्हाडांकडून कथित संभाषणाची रेकोर्डिंग व्हायरल.
आपल्या (मुस्लीम) समाजाची रॅली होती तेव्हा जाणीवपूर्वक त्याला (अक्षय शिंदे) पोलिसांनी मारलं आहे. जितेंद्र आव्हाडांकडून कथित संभाषणाची रेकोर्डिंग व्हायरल.
बदलापूर येथे १२ आणि १३ ऑगस्टला झालेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. यानंतर २० ऑगस्टला बदलापूरमध्ये लोकांनी उत्स्फूर्त बंदही पुकारला होता तसंच रेल रोकोही केला होता. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली. त्याला फाशी दिली पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र यानंतर अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीनेही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणासाठी तळोजा तुरुंगातून अक्षय शिंदेला ठाण्याला नेत असताना चकमकीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरुन आता जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत मोठा आरोप केला आहे. ही क्लिप कथित प्रत्यक्षदर्शींची असल्याचा आव्हाडांचा दावा आहे.
(संग्रहित दृश्य.)
आव्हाडांकडून प्रत्यक्षदर्शींची एक क्लिप पोस्ट.
२३ सप्टेंबरला अक्षय शिंदेला पोलिसांच्या व्हॅनमधून ठाण्याच्या दिशेने आणण्यात येत होतं. त्यावेळी मुंब्रा येथे अक्षय शिंदेने पोलिसांच्या हातून बंदुक हिसकावली. त्यानंतर अक्षय शिंदेने गोळीबार केला आणि त्यात दोन पोलीस जखमी झाले. उत्तरादाखल ज्या गोळ्या चालवण्यात आल्या त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. हा एन्काऊंटर सरकारने ठरवून घडवून आणल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. तर अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळ्या झाडल्यानंतर पोलीस त्याला कायदा सांगत बसतील का ? असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या प्रकरणाला पाच दिवस उलटल्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यक्षदर्शींची एक क्लिप पोस्ट केली आहे.या क्लीपमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
(संग्रहित दृश्य.)
हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती.
जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलेल्या क्लिपमधलं संभाषण दोन हिंदी भाषिक व्यक्तींमधलं आहे. हे दोघंही मुंब्रा भागातले रहिवासी आहेत असं संभाषणावरुन लक्षात येतं. अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जात आहे. ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका. निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. असं या संभाषणाबाबत आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
आव्हाडांनी केलेली पोस्ट.
व्हायरल संभाषण.
कथित प्रत्यक्षदर्शी : हॅलो, सलाम वालेकुम भाई समोरचा ऐकणारा : वालेकुम सलाम कथित प्रत्यक्षदर्शी : तुम्हाला एक व्हॉट्स अॅप पाठवला होता मी, पण नंतर मी घाबरलो आणि ते डिलिट केलं. ऐकणारा : का ? कथित प्रत्यक्षदर्शी : काय आहे ते अक्षय शिंदेची जी हत्या झाली त्या व्हॅनच्या मागे माझी गाडी होती. ऐकणारा : अच्छा कथित प्रत्यक्षदर्शी : मी ते पाहिलं, पण मी काही करु शकलो नाही. म्हटलं तुम्हाला सांगावं. पण काही चुकीचा मेसेज गेला तर पोलीस माझ्या मागे लागतील ऐकणारा : अच्छा, व्हिडीओ होता का तुमच्याकडे ? कथित प्रत्यक्षदर्शी : नाही व्हिडीओ नव्हता. मी आणि माझा मेहुणा रॅलीमध्ये चाललो होतो. ऐकणारा : हां, मग कथित प्रत्यक्षदर्शी : मुंब्रा बायपासच्या वाय जंक्शनच्या आधी आम्ही पोहचलो होतो. ऐकणारा : हां हां. कथित प्रत्यक्षदर्शी : आपण मुंब्र्याचा डोंगर चढतो ना, तिथून आम्हाला पोलिसांच्या व्हॅनने ओव्हरटेक केलं. ऐकणारा : हां हां. कथित प्रत्यक्षदर्शी : पोलिसांच्या व्हॅनला पडदे लावण्यात आले होते, काही दिसत नव्हतं. ऐकणारा :हां, अच्छा. कथित प्रत्यक्षदर्शी : पोलिसांची व्हॅन पुढे गेली तेव्हा ठक् असा आवाज आला. आम्हाला वाटलं गाडीच्या पाट्याचा आवाज आला. ऐकणारा : हां कथित प्रत्यक्षदर्शी : त्यानंतर दुसऱ्यांदा ठक् असा आवाज आला. मी जरा घाबरलो मला वाटलं काहीतरी इश्यू असणार. ऐकणारा : हां कथित प्रत्यक्षदर्शी : पोलिसांनी गाडी थांबवली, दोन पोलीस बाहेर आले त्यांनी दरवाजा उघडला. नंतर त्यांनी दरवाजा बंद केला आणि पुढे गेले. त्यानंतर तिसऱ्यांदा आवाज आला. ऐकणारा : अच्छा कथित प्रत्यक्षदर्शी : त्यानंतर..आम्ही घाबरलो. मी कसंतरी त्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि पुढे गेलो, त्यानंतर पोलिसांची व्हॅन कळव्याच्या दिशेने गेली. आम्ही टी जंक्शनला गेलो. ऐकणारा : अच्छा कथित प्रत्यक्षदर्शी : आत्ता तुमच्याशी बोलतानाही मी घाबरलो आहे. पुढे काही प्रॉब्लेम व्हायला नको. ऐकणारा : नाही नाही बोला, काय प्रॉब्लेम होणार आहे ? कथित प्रत्यक्षदर्शी : आम्हाला पहिल्यांदा असंच वाटलं की गाडीचा पाटा वाजला. गाडी उसळते ना. त्यामुळे तसं वाटलं. ऐकणारा : हां हां.. कथित प्रत्यक्षदर्शी : ठक्, ठक्, ठक् असा आवाज तीनवेळा आला. गाडीला पडदे लावले होते. माझा मेहुणाही घाबरला तो म्हणाला भाईजान चला इथून. आम्ही घाबरलो आणि कसेबसे तिथून निघालो. आम्ही रॅलीसाठी चाललो होतो. त्यानंतर आम्ही जेव्हा मोबाइल पाहिला तेव्हा कळलं की अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. ऐकणारा : हां कथित प्रत्यक्षदर्शी : मी म्हटलं चला आता हे कुणाला सांगावं म्हणून तुम्हाला सांगतो आहे. मी तुमचा फॉलोअर आहे तुमच्यावर विश्वास आहे म्हणून हे तुम्हाला सांगतो आहे. ऐकणारा : अच्छा, पण तुम्ही व्हॉट्स अॅप काय केलं होतं ? काही व्हिडीओ वगैरे होता का ? कथित प्रत्यक्षदर्शी : नाही. मी व्हिडीओ वगैरे पाठवला नव्हता. मी माझा आवाजच तुम्हाला रेकॉर्ड करुन पाठवला होता. अक्षय शिंदेची हत्या मी पाहिली हेच तुम्हाला सांगत होतो. पण नंतर मी तो मेसेज डिलिट केला. मला वाटलं की मी अडचणींत येईन. ऐकणारा : अच्छा, पण घाबरण्याचं काही कारण नाही. कथित प्रत्यक्षदर्शी : आपल्या समाजाची रॅली होती तेव्हा जाणीवपूर्वक त्याला (अक्षय शिंदे) पोलिसांनी मारलं आहे. ऐकणारा : हो कथित प्रत्यक्षदर्शी : आता माहीत नाही. आता तुम्ही बघा काय करायचं. त्या ठिकाणी सीसीटीव्ही वगैरे तर असतीलच ना. ऐकणारा : नाही तिकडे काही सीसीटीव्ही वगैरे नाही. कथित प्रत्यक्षदर्शी : डोंगराच्या बाजूला एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही ? ऐकणारा : नाही, एकही नाही. कथित प्रत्यक्षदर्शी : हो का ? ऐकणारा : वाय जंक्शनचा जो पूल सुरु होतो त्याच्यापुढे चकमक झाल्याचं ते सांगत आहेत. कथित प्रत्यक्षदर्शी : नाही तिथे नाही, मी सांगतो तुम्हाला तो जो दर्गा आहे ना. ऐकणारा : अच्छा फकिरशाह बाबांचा दर्गा आहे तिथे कथित प्रत्यक्षदर्शी : हो हो तिथून थोडं पुढे, ठक् आवाज आला. ऐकणारा : मुंब्र्याच्या दिशेने व्हॅन जात होती की शिळ फाटा रस्त्याने ? कथित प्रत्यक्षदर्शी : शिळफाट्यावरुन आम्ही मुंब्र्याच्या दिशेने चाललो होतो. ऐकणारा : अच्छा कथित प्रत्यक्षदर्शी : तो दर्गा गेल्यानंतर गाडीने आम्हाला ओव्हरटेक केलं. आम्ही काही वेगाने चाललो नव्हतो त्यानंतर ते आवाज आले. सगळेजण सिव्हिल ड्रेसमध्ये होते. एकाही पोलिसाने गणवेश घातला नव्हता. ऐकणारा : अच्छा अच्छा. सिव्हिलवाले होते. कथित प्रत्यक्षदर्शी : त्यांनी दोन गोळ्या चालवल्यावर व्हॅन उघडली होती. मग दरवाजा बंद केला. पुढे गेले आणि तिसरा ठक् असा आवाज आला. ऐकणारा : हां हां कथित प्रत्यक्षदर्शी : मग गाडी घेऊन पुढे गेले त्यानंतर पूल जिथे संपतो तिथे ते थांबले, त्यानंतर आम्ही पुढे निघून गेलो. ऐकणारा : अच्छा कथित प्रत्यक्षदर्शी : त्यानंतर ते लोक कळव्याच्या दिशेने गेले. आम्ही तिथून निघून गेलो. पण गाडीला पडदे वगैरे सगळं नीट लावण्यात आलं होतं. आम्हाला तेव्हाच वाटलं होतं की काहीतरी गडबड आहे. ऐकणारा : अच्छा, अच्छा. कथित प्रत्यक्षदर्शी : तुम्हाला काही माहिती मिळाली तर तुम्ही सांगू शकता ना म्हणून सांगितलं. ऐकणारा : तुम्ही जो स्पॉट सांगितला त्याची चौकशी करतो. तिथे सीसीटीव्ही आहे का पाहतो. (सदर संवाद हिंदीत झाला आहे. आम्ही मराठीत दिला आहे.)