राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीडमधल्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर या प्रकरणात आरोपींना अटक झाली. शिवाय या कटाचा सूत्रधार वाल्मिक कराडलाही अटक झाली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा असल्याचे मानले जाते. त्यामुळे सदर प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने होत होती. मात्र धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नव्हता. अखेर सोमवार (दि. ३) मार्चला संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष याचं मे २०२४ मधलं एक वक्तव्य ही व्हायरल होतं आहे. धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे असं शरद पवार म्हणाले होते.
(संग्रहित दृश्य.)
धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस…….
मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार मे महिन्यात सुरु होता. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी ४१ आमदारांना बरोबर घेत महायुतीसह जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात टोकाचे मतभेद झाले. याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले होते की तुम्ही (शरद पवार) पुलोद सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि अजित पवार महायुतीबरोबर गेले तर ते गद्दार ? शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या. शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला. ते सगळे संस्कार होते आम्ही निर्णय घेतला तर आम्ही गद्दार ? ही निवडणूक भाऊबंदकीची नाही. देशाचा पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान मोदी होतील की इतर कोण ? हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे असं त्यांनी म्हटलं होतं.
(संग्रहित दृश्य.)
त्यांना बाहेर फिरणं मुश्कील होईल….
धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस. त्यांना कशा कशांतून बाहेर काढलं आहे हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्कील होईल. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग आणि इतर गोष्टींबाबत मी आत्ता बोलू इच्छित नाही. एका लहान कुटुंबातला उदयोन्मुख तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरुन विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली. लोकांची नाराजी होती तरीही मी त्यांना ही जबाबदारी दिली. हे सगळं माहीत असतानाही ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करु लागले आहेत. कुटुंबावर हल्ले करत आहेत. मी त्यांच्याबाबत आज जे बोललो ते शेवटचं यापुढे बोलणार नाही.