महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (दि. ३) मार्चपासून सुरू झालं आहे. या अधिवेशनासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांचे आमदार मोठ्या संख्येने विधीमंडळात दाखल झाले आहेत. दरम्यान या अधिवेशनासाठी विधीमंडळ परिसरात दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्षाचे) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण आमदार जितेंद्र आव्हाड एक मोठा दगड घेऊन विधीमंडळ परिसरात पोहोचले होते. आव्हाडांचा असा अवतार पाहून सर्व प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना हा दगड विधीमंडळात आणण्यामागचं कारण विचारलं. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले. हे आपल्या राज्यातील महायुतीच्या सरकारचं हृदय आहे. कारण याला पाझरच फुटत नाही. एकवेळ पाषाणाला पाझर फुटेल. परंतु आपल्या सरकारला पाझर फुटणार नाही. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ८० दिवस उलटले तरी सरकारने अद्याप या प्रकरणी कोणतीही मोठी कारवाई केलेली नाही. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड व त्याचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात असून सीआयडीने या प्रकरणी दोषारोप पत्र सादर केलं आहे. या दोषारोप पत्रातून निर्घृण हत्याकांडाशी संबंधित काही फोटो समोर आले आहेत. काळीज चिरणारे ते फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. मात्र सरकारने याप्रकरणी कुठलंही ठोस पाऊल उचलेलं नाही. परिणामी या सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड आज विधीमंडळ परिसरात मोठा दगड घेऊन आले असल्याचे त्यांनी सांगितले.
(संग्रहित दृश्य.)
जितेंद्र आव्हाड दगड घेऊन विधीमंडळ परिसरात …..
राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले कि या पाषाणाला पाझर फुटू शकतो पण युती सरकारला पाझर फुटत नाही. ८० दिवसांपासून आम्ही बोंबलून सांगतोय की ही हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली आहे. त्या मारेकऱ्यांच्या कार्याला सीमा नाही. इतकं सांगूनही त्या हत्याकांडाचे फोटो व व्हिडीओ पाहूनही पाषाणहृदयी सरकारला पाझर फुटला नाही. म्हणून सरकारचं प्रतिकात्मक हृदय दाखवण्यासाठी मी हा दगड घेऊन आलो आहे दरम्यान विधीमंडळातील सुरक्षारक्षकांनी आमदार आव्हाड यांना हा दगड घेऊन विधीमंडळ परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यावर ते म्हणाले मी हा दगड घेऊन विधीमंडळात जाणार नाही. मी पोलिसांना शब्द दिला आहे. मी हे केवळ राज्यातील जनतेला दाखवतोय. हे या महायुती सरकारचं हृदय आहे.