Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati, The New Tussle of Baramati(संग्रहित दृश्य.)

पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार सामना पाहायला मिळणार.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. त्यानंतर आता काका आणि पुतण्यात लढत होणार आहे. यासंदर्भातच बोलताना आज अजित पवारांनी बारामतीत एक मोठं विधान केलं.  लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करून मी चूक केली. पण आता युगेंद्र पवार यांना माझ्या विरोधात उभं करून तीच चूक  शरद पवार यांनी करायला नको होती. असं अजित पवारांनी म्हटलं आहे. लोकशाहीत निवडणुकीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे. माझ्या विरोधात जेव्हा-जेव्हा जे उमेदवार उभे राहिले, ते सर्वच उमेदवार स्ट्रॉंग आहेत असं समजूनच माझ्या कार्यकर्त्यांनी, मी आणि माझ्या कुटुंबाने नेहमीच प्रचार केला. आता या निवडणुकीत देखील बारामतीकर चांगल्या मताधिक्यांनी मला निवडून देतील असा मला विश्वास आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार पुढे म्हणाले, त्यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मी त्याबाबत जास्त काही बोलणार नाही. मात्र, त्यांनी (शरद पवार) असं करायला नको होतं. लोकसभेच्या निवडणुकीत मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली, ती माझी चूक होती. पण तीच चूक पुन्हा शरद पवार यांनी  करायला नको होती, पण चूक केली आहे. आता मतदार यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काका-पुतण्या आमने-सामने आहेत. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आणि अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळत आहे.  या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.